Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत फिल्मी स्टाईल थरार!४५ मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर ४२ लाखांच्या मुद्देमालासह १३४ किलो गांजा जप्त; बारामतीचा आरोपी जेरबंद

सांगलीत फिल्मी स्टाईल थरार!
४५ मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर ४२ लाखांच्या मुद्देमालासह १३४ किलो गांजा जप्त; बारामतीचा आरोपी जेरबंद

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) आणि एम.आय.डी.सी. कुपवाड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गांजाची तस्करी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला सिनेमॅटिक स्टाईलने थरारक पाठलाग करून रंगेहात पकडले. त्याच्या ताब्यातून तब्बल १३४ किलो ग्रॅम गांजा आणि सोन्याच्या रंगाची इनोव्हा कार, असा एकूण ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सांगली आणि पुणे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकी विजय कांबळे (वय ३२, रा. भिमनगर, पिंपळी रोड, जाळोची, ता. बारामती, जि. पुणे) या आरोपीला अटक केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थ तस्करी आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांचे एक विशेष पथक तयार केले होते. बुधवारी रात्री  पथकातील संदीप नलावडे आणि सागर लवटे यांना बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. बारामतीमधील एकजण विना नंबरच्या सोनेरी रंगाच्या इनोव्हा कारमधून गांजाची वाहतूक करत असून तो तासगावकडून सांगलीच्या दिशेने येत असल्याची ती माहिती होती.

४५ मिनिटांचा थरारक पाठलाग 
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कवलापूर येथे सापळा रचला. संशयित इनोव्हा कार भरधाव वेगाने सांगलीकडे जाताना दिसताच पोलिसांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता वेग वाढवून पळ काढला.
यानंतर पोलीस पथकाने दुचाकी आणि खाजगी वाहनांच्या सहाय्याने त्या कारचा पाठलाग सुरू केला. आरोपीने पोलिसांना हुलकावणी देत कार माधवनगर, संजयनगर, अहिल्यानगर आणि रामरहीम कॉलनीच्या गल्लीबोळातून भरधाव वेगाने पळवली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एलसीबीने तातडीने संजयनगर आणि एम.आय.डी.सी. कुपवाड पोलीस ठाण्याला माहिती दिली. अखेर सुमारे ४५ मिनिटांच्या थरारक पाठलागानंतर कुपवाडमधील जुन्या जकात नाक्याजवळ पोलिसांनी कारला चहूबाजूंनी घेरले आणि पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या चालकाला शिताफीने ताब्यात घेतले.

पोलिसांनी पंचांसमक्ष गाडीची झडती घेतली असता, इनोव्हा कारच्या पाठीमागील डिकीमध्ये खाकी रंगाच्या चिकटपट्टीने गुंडाळलेली ६६ पॅकेट्स आणि निळ्या रंगाची पिशवी आढळून आली. यामध्ये तब्बल ३३ लाख ५० हजार रुपये किमतीचा १३४ किलो ग्रॅम हिरवट काळपट रंगाचा तयार गांजा मिळून आला. त्याच्याकडून 33.50 लाखांचा १३४ किलो गांजा, इनोव्हा कार, दोन मोबाईल, वायरलेस डोंगल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ओडिसा ते सांगली कनेक्शन; आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार
पोलिसांनी आरोपी विकी कांबळेकडे कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याचा पुणे येथील मित्र चंदनसिंग याने गांजा आणण्यासाठी पैसे दिले होते. हा गांजा ओडिसा राज्यातील संभलपूर येथील 'जॉकी' नावाच्या व्यक्तीकडून विकत आणला होता. सांगलीतील हरीपूर येथील 'पप्पू फाकडे' याने मागणी केल्यामुळे हा गांजा बारामतीवरून मायणी-विटा-तासगाव मार्गे सांगलीत आणला जात असल्याची कबुली आरोपीने दिली. विशेष म्हणजे, पकडलेला आरोपी विकी कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून पुणे ग्रामीणच्या बारामती शहर पोलीस ठाण्यातील तब्बल ४७८ किलोग्रॅम गांजाच्या गुन्ह्यातील तो पाहिजे असलेला (फरार) आरोपी आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि लहु थाटे, सपोनि आनंदराव घाडगे, सपोनि कुलदीप संकपाळ, सांगली एलसीबी, पुणे ग्रामीण एलसीबी व एमआयडीसी कुपवाड पोलीस अंमलदारांच्या पथकाने केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.