पोलिसांचा खबरीच निघाला अॅसिड हल्ल्याचा सूत्रधार
नाशिक : खरा पंचनामा
जिल्ह्यातील येवला तालुक्यातल्या देवळाणे गावाला हादरवून सोडणाऱ्या शेतकरी भाऊसाहेब बोर्डे दाम्पत्यावरील अॅसिड हल्ला प्रकरणात आता अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. ज्याच्यावर पोलिसांनाही विश्वास होता आणि जो स्वतःला पोलिसांचा खबरी तसेच मदतनीस म्हणून वावरत होता, तोच या भयानक कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
काही दिवसांपूर्वी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर रात्री झोपेत असताना अज्ञात व्यक्तींनी अॅसिड टाकून जीवघेणा हल्ला केला होता. या घटनेमुळे संपूर्ण देवळाणे गावासह येवला तालुक्यात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू करताच आरोपी चांगदेव मोरे हा स्वतः पोलिसांसोबत फिरत होता. तो पोलिसांना मदत करत असल्याचा आव आणत होता.
विशेष म्हणजे, तपासाची दिशा भरकटावी आणि संशय दुसऱ्यांवर जावा यासाठी आरोपीने दुसऱ्याच्या नावाने चिठ्ठी लिहून पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे सुरुवातीला तपास वेगळ्याच दिशेने गेला होता. मात्र नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या सखोल आणि बारकाईच्या तपासामुळे अखेर या प्रकरणातील सत्य बाहेर आले.
पोलिस तपासात शेतीच्या जुन्या वादातून चांगदेव मोरे याने साथीदार सचिन कोटमे यांच्या मदतीने हा संपूर्ण कट रचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे.
या प्रकरणात आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे. ग्रामीण पोलिसांच्या तपास कौशल्यामुळे हे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, देवळाणे गावात आरोपीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांनी माहिती देताना तपासात महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचे सांगितले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.