संजय भोकरेचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक
ठाकरे सेनेच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश : दोन गावठी पिस्तूल, काडतूसे जप्त
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार तयार केलेल्या एलसीबीच्या पथकाची धडाकेबाज कारवाई
पहा व्हिडीओ
सांगली : खरा पंचनामा
जमिनीच्या वादातून संजय भोकरेचा गेम करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना शितफिने अटक करण्यात आली. त्यामध्ये ठाकरे सेनेच्या दोन माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूले, काडतूसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगलीचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हे प्रतिबंधासाठी तयार केलेल्या एलसीबीच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे.
गणेश चंद्रकांत लोखंडे (वय ३३, रा. लक्ष्मी पार्क, हरिपूर रोड, सांगली), विराज प्रकाश बुटाले (वय ४१, रा. आंबेडकर रोड, सांगली) आणि संग्राम संभाजी फडतरे (वय २७, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रोड, सांगली) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर सचिन आवळे (रा. सांगलीवाडी) हा फरार आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, चार जिवंत काडतुसे, धारदार चाकू आणि बनावट नंबर प्लेट लावलेली मारुती ८०० कार असा १ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील लोखंडे आणि बुटाले हे ठाकरे सेनेचे माजी पदाधिकारी आहेत.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अवैध शस्त्रधारक व गंभीर गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने सांगली शहर परिसरात गस्त सुरू केली होती. त्यावेळी गोपनीय माहितीदारामार्फत पाटणे प्लॉट ते अंकली काळीवाट रस्त्यावर काही जण खुनाच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.
पोलीसांनी तत्काळ सापळा रचून राजू गंगावाणी यांच्या शेतालगत उभ्या असलेल्या मारुती ८०० कारवर छापा टाकला. आरोपींची झडती घेतली असता गणेश लोखंडे व विराज बुटाले यांच्याकडे प्रत्येकी एक पिस्टल व दोन जिवंत काडतुसे आढळली. कारच्या सीटखाली धारदार चाकूही सापडला.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली. भोकरे इंजिनिअरिंग कॉलेजजवळील जमिनीच्या वादातून संजय भोकरेचा काटा काढण्याचा कट रचण्यात आल्याची कबुली संशयितानी दिली. उत्तरप्रदेशातील सोनभद्र येथून पिस्टल खरेदी करण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. संशयित भोकरेच्या हालचालींवर पाळत ठेवून योग्य संधी मिळताच हल्ला करण्याच्या तयारीत होते. वाहनाची ओळख लपवण्यासाठी बनावट नंबर प्लेट वापरण्यात आली होती.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर होळकर करीत आहेत. न्यायालयाने आरोपींना ११ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, अमोल ऐदाळे, संदीप पाटील, प्रकाश पाटील, संकेत कानडे, अभिजित माळकर, रोहन घस्ते, सुरज थोरात,, विनायक सनदी, चालक शिवाजी सिद, सायबर पोलीस ठाणेकडील सतीश आलदर, इम्रान महालकरी, कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर, अजय बेंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.