दिल्लीतून एका रात्रीत चक्र फिरली
एकनाथ शिंदेंसोबत शिक्षणासम्राट असलेला बडा नेता गुप्त बैठकीला हजर

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक आणि अतिशय गुप्तता पाळत रविवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

या अत्यंत गोपनीय भेटीमुळे आणि शिंदेंनी पाळलेल्या गुप्ततेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत या दौऱ्यावर माजी मंत्री उपस्थित असल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

अवघ्या चार दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या अधिकृत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी अमित शाह यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती, परंतु शाह यांच्या व्यग्रतेमुळे त्यांची भेट होऊ शकली नाही आणि शिंदेंना माघारी परतावे लागले होते. या न झालेल्या भेटीमुळे शिंदे काहीसे अस्वस्थ होते आणि त्यांनी भेटीसाठी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या आग्रहानंतर शनिवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्याकडून रविवारी भेटीसाठी येण्याचा निरोप आला. हा निरोप मिळताच शिंदेंनी कोणतीही वेळ न दवडता खाजगी विमानाने तातडीने दिल्ली गाठली.

दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत त्यांची तब्बल अर्धा तास चर्चा झाली. या बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांतील राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीनंतर शिंदे थेट बंगळुरूला गेले व तेथून ठाण्यात परतले.

विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रवासात शिंदेंनी आपला नेहमीचा ताफा आणि अधिकृत सहाय्यकांना दूर ठेवले होते. त्याऐवजी राज्याचे एक माजी मंत्री आणि बडे 'शिक्षणसम्राट' या दौऱ्यात त्यांच्यासोबत सावलीसारखे हजर होते. मध्यंतरीच्या काळात या नेत्याचे आणि शिंदेंचे संबंध काहीसे ताणले गेले होते, परंतु सध्या त्यांच्याकडे पक्षात मोठी जबाबदारी आहे. या नेत्याने आपण दिल्लीला गेल्याची कबुली दिली असली, तरी हे केवळ 'पक्षाचे काम' असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिंदे आणि शाह यांच्या या अचानक झालेल्या गोपनीय भेटीने महायुतीसह विरोधी पक्षांच्या गोटातही खळबळ उडवून दिली असून, आगामी काळात राज्यात काय राजकीय घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांची फोनवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. महायुतीत दोन जागा भाजप आणि शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या बनल्याची चर्चा सुरु आहे. संभाजी नगरच्या जागा भाजपने घेतल्यास तिथून कांग्रेसमधून आलेले कैलास गौरंट्याल यांना ऊमेदवारी देण्याचा पक्षाचा मानस असल्याचे म्हटले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.