पोटात दारूचे अंशच नाहीत? फुगेवाडी प्रकरणात धक्कादायक वैद्यकीय खुलासा
पुणे : खरा पंचनामा
फुगेवाडी परिसरातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. शव विच्छेदनात मृतांच्या पोटात दारूचे थेट अंश आढळून आले नसल्याची माहिती समोर आली आहे. विषारी घटक शरीरात भिनल्याने शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम केल्याने त्याचा हृदयावरील ताण वाढून हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
मृत्यूचे खरे कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन करणा-या डॉक्टरांनी मृतदेहाचा व्हिसेरा काढून तपासणीकरिता पोलिसांद्वारे फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला आहे. या प्रकरणातील मृत व्यक्तींच्या शवविच्छेदनादरम्यान दारूचे अंश आढळून आले नाहीत. मात्र, संबंधितांनी दोन दिवसांपूर्वी सेवन केलेल्या संशयित द्रव्यातील विषारी रसायने शरीरात पूर्णपणे मिसळली असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ही रसायने रक्ताभिसरणाद्वारे शरीराच्या विविध भागांमध्ये पोहोचून यकृत, मूत्रपिंड, मेंदू आणि हृदयासह महत्त्वाचे अवयव निकामी करण्यास कारणीभूत ठरली असावीत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, बहुतांश मृत्यूंच्या प्राथमिक तपासात हृदयक्रिया बंद पडल्याचे कारण समोर आले आहे. त्यामुळे सुरुवातीला हे मृत्यू नैसर्गिक किंवा हृदयविकारामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मात्र, एकाच परिसरातील सलग मृत्यू आणि त्यामागील समान धागे समोर आल्यानंतर तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, काही विषारी रासायनिक घटक शरीरात गेल्यानंतर ते अतिशय वेगाने शोषले जातात. त्यामुळे शवविच्छेदनावेळी पोटात किंवा शरीरात दारूचे थेट अंश आढळून येत नाहीत. मात्र, त्यांचा परिणाम अंतर्गत अवयवांवर स्पष्टपणे दिसून येतो.
याच कारणामुळे मृत्यूचे अंतिम कारण निश्चित करण्यासाठी सर्व मृतांचे व्हिसेरा नमुने रासायनिक विश्लेषणासाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत फुगेवाडीतील या सामूहिक मृत्यू प्रकरणाभोवतीचे संशयाचे धुके कायम राहणार असून नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष आता न्यायवैद्यकीय अहवालाकडे लागले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.