जबरी चोरी करणाऱ्या सोलापूरच्या अट्टल चोरट्याला अटक
दोन गुन्हे उघड : ५.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त : एलसीबीची कारवाई
पूजा फडके
विटा : खरा पंचनामा
विटा शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत रेकॉर्डवरील एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटरसायकल असा एकूण ५ लाख ७३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या अटकेमुळे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीचे दोन गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.
महादेव शंकर पवार (वय ३०, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
त्याचे साथीदार विनोद गोविंद पिंपळे आणि चोरीचे दागिने विकण्यास मदत करणारी मीनाबाई चव्हाण (दोघे रा. श्रीपूर, सोलापूर) हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
गेल्या आठवड्यात, १५ मे रोजी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी सौ. स्मिता शंकर शेंडगे (रा. गांधी चौक, विटा) या आपल्या घरासमोर उभ्या असताना, मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून नेले होते. याप्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या पथकाने विटा परिसरात गस्त वाढवली होती.
२२ मे रोजी विटा भागात पेट्रोलिंग करत असताना पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, संशयित आरोपी महादेव पवार हा चोरीचे दागिने विकण्यासाठी पल्सर मोटरसायकलवरून विटा-पारे रोडवरील बजरंगनगर येथे येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीला पळून जाण्याची संधी न देता जागीच ताब्यात घेतले.
दोन गुन्ह्यांची दिली कबुली:
दोन पंचांसमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १८.२९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण आणि सोन्याच्या साखळ्या मिळून आल्या. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार विनोद पिंपळे याच्यासह विटा शहरात दोन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याची कबुली दिली. यापूर्वी मकरसंक्रांतीच्या सणावेळी देखील त्यांनी अशाच प्रकारे एका पायी जाणाऱ्या महिलेचे गंठण चोरले होते. हे चोरीचे दागिने विनोदची आत्या मीनाबाई चव्हाण हिच्या मदतीने विकून १ लाख ५० हजार रुपये मिळवल्याचेही त्याने मान्य केले.
जप्त केलेला मुद्देमाल:
२ लाख ८८ हजार ९८२ रुपये किमतीचे १८.२९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण व वाट्या, १ लाख ४३ हजार ४५८ रुपये किमतीच्या ८.५१० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन साखळ्या, १ लाख ५० हजार किमतीची बजाज पल्सर (N 160) मोटरसायकल (क्र. MH 45 BE 3438) असा एकूण ५ लाख ७३ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही अनेक मालमत्तेचे गुन्हे दाखल असून तो पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. पुढील तपासासाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल विटा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सपोनि राजेंद्र यादव, अंमलदार हणमंत लोहार, संजय पाटील, अतुल माने, अभिजित ठाणेकर, प्रमोद साखरपे, सुनील जाधव, ऋतुराज होळकर, सुमीत सूर्यवंशी, करण परदेशी आणि सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.