Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विनापरवाना पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसांसह इचलकरंजीचा तरुण गजाआड!सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

विनापरवाना पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसांसह इचलकरंजीचा तरुण गजाआड!
सांगलीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

सांगली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) एका धडक कारवाईत बेकायदेशीररीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ६१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आली आहेत. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली असून आरोपीला २५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध शस्त्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांना दिले होते. या आदेशानुसार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांचे पथक सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. पेट्रोलिंग दरम्यान जुना जकात नाका (इनाम धामणी) येथे आले असता, सहाय्यक पोलीस फौजदार सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सचिन कनप आणि सोमनाथ पतंगे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून विश्वासू माहिती मिळाली. माहितीनुसार, एक संशयित तरुण चॉकलेटी रंगाचा चौकड्याचा शर्ट घालून जुनी धामणी ते अंकली जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर कंबरेला शस्त्र खोचून उभा होता.

माहिती मिळताच पोलिसांनी पंचांसह विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ आपली वाहने थांबवली आणि तेथून पायी चालत नागपूर-रत्नागिरी हायवे ब्रिजखालून अंकली फाट्याकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर पाळत ठेवली. तेथे 'अयांश इंटरप्रायझेस गोडाऊन' जवळ बातमीतील वर्णनाचा एक तरुण उभा असलेला दिसला. पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्याला जागीच घेरून ताब्यात घेतले.

पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव शिवम अर्जुन शिंगारे (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं. ४, अण्णा रामगोंडा शाळेजवळ, नारळ चौक, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे आहे. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कंबरेला उजव्या बाजूला एक लोखंडी पिस्तूल आणि पॅन्टच्या डाव्या खिशात दोन जिवंत काडतुसे मिळून आली. या बेकायदेशीर मुद्देमालाची एकूण किंमत ६१,००० रुपये आहे. शस्त्राबाबत विचारपूस केली असता, हे पिस्तूल त्याने दोन वर्षांपूर्वी इचलकरंजी येथील त्याच्या ओळखीच्या गजानन खामकर नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात आर्म ॲक्ट कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)/१३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध ही विशेष मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कुमार पाटील, सुभाष सुर्यवंशी, राजाराम मुळे, श्रीधर बागडी, सचिन कनप, सोमनाथ पतंगे, रूपेश होळकर, सुमित सुर्यवंशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.