Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की

पुणे : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर काळी शाई फेकून धक्काबुक्की करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, लवांडे यांनी थेट संग्राम महाराज भंडारे व त्यांच्या समर्थकांवर गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील आळंदी मातोबा येथे आयोजित कार्यक्रम आणि प्रवचन आटोपल्यानंतर विकास लवांडे आज शनिवारी (ता.९) पुण्याकडे परतत होते. सकाळी दहाच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग करत गाडी अडवली. त्यानंतर त्यांच्या अंगावर काळी शाई फेकण्यात आली तसेच धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या घटनेबाबत बोलताना विकास लवांडे म्हणाले, "संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत असलेले काही समर्थक तीन ते चार चारचाकी वाहनांतून आले होते. त्यांनी माझी गाडी अडवून माझ्यावर शाई फेकली, धक्काबुक्की केली आणि पिस्तूल दाखवत धमकी दिली. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले." 

दरम्यान, घटनेनंतर विकास लवांडे यांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वारकरी संप्रदायासंदर्भातील लेखावरून राज्यातील राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून पवारांवर टीकेची झोड उठवण्यात येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील कथित "२० घुसखोरांची" नावे जाहीर केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. लवांडे यांच्या या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत असून, याच पार्श्वभूमीवर त्यांच्यावर काळी शाई फेकण्याची घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.