Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुण्यातील 'नाईट लाईफ'ला पोलिसांकडून 'ब्रेक'

पुण्यातील 'नाईट लाईफ'ला पोलिसांकडून 'ब्रेक'

पुणे : खरा पंचनामा 

शहरातील विविध भागांत बेकायदा सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्या, पानटपऱ्या रात्री दहा वाजता बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. त्यासह शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार हे ठरवून दिलेल्या वेळेनुसार बंद करण्यात येणार आहेत.

'नाईट लाईफ'च्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालणे, तसेच बेशिस्तांविरुद्ध कारवाईसाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे,' असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

शहरात खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे वाढले आहेत. गुन्हेगारीच्या घटना वाढल्यानंतर रात्री पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत जाऊन पाहणी केली. शांततेचा भंग, रहिवाशांच्या तक्रारी विचारात घेऊन पोलिसांनी वेळेत पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील डेक्कन चौपाटी, नळ स्टॉप चौक, कर्वेनगर, कोरेगाव पार्क, विमाननगर, हडपसर, कोंढवा, बाणेर, कात्रज भागात रात्री उशिरापर्यंत खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरू असल्याचे दिसून आले होते.

'शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा गेल्या आठवड्यात आढावा घेण्यात आला. रात्रीच्या वेळी पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर गर्दी झाली होती. बेकायदा सुरू असलेल्या गाड्यांवर गर्दी झाली होती. रात्री अपरात्री सुरू असलेल्या गाड्यांमुळे गैरप्रकार होतात. नियमाप्रमाणे रात्री दहा वाजता पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,' असे आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

'शहरातील अन्य आस्थापने अर्थात हॉटेल, बार, रेस्टॉरंट ठरवून दिलेल्या वेळेत बंद होतील,' असेही आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितलं.

याच निर्णयावरून खासदार सुप्रिया सुळेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय? असा सवाल सुप्रिया सुळेंनी 'एक्स' अकाउंटवर ट्विट करत विचारला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, "पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी / प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय?"

"एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत?" असा प्रश्नही सुप्रिया सुळेंनी विचारला आहे.

"पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे," अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.