सांगलीत ‘शून्य सावली दिवस’चा अनोखा अनुभव
विद्यार्थी, खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग; काही क्षण सावली झाली गायब
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगलीकरांनी गुरुवारी ‘शून्य सावली दिवस’ या दुर्मिळ खगोलीय घटनेचा अनोखा अनुभव घेतला. दुपारी सूर्य थेट डोक्यावर आल्यानंतर काही क्षणांसाठी वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी झाल्याचे चित्र शहरातील विविध भागांत पाहायला मिळाले. विद्यार्थी, खगोलप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहात या घटनेचे निरीक्षण केले.
दुपारी सुमारे १२ वाजून २८ मिनिटांच्या सुमारास सूर्य ९० अंशाच्या कोनात आल्याने उभ्या वस्तूंची सावली त्यांच्या पायाखालीच लपली. अनेकांनी गच्ची, मैदान तसेच मोकळ्या जागांमध्ये बाटल्या, पीव्हीसी पाईप, लाकडी दांडे उभे करून हा प्रयोग अनुभवला. काही क्षण सावली पूर्णपणे अदृश्य झाल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
या वेळी विद्यार्थ्यांना पृथ्वीचा कल, सूर्याचे भासमान भ्रमण आणि उत्तरायण-दक्षिणायन याविषयी माहिती देण्यात आली. खगोलशास्त्राविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा अनुभव महत्त्वाचा असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. किड्स पॅराडाईज स्कूल च्या डॉ. जयंत नारळीकर खगोलशास्त्र क्लब यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी नागरिकांना सुरक्षिततेचेही आवाहन करण्यात आले.
कडक उन्हामुळे अल्प वेळच निरीक्षण करावे, पुरेसे पाणी प्यावे तसेच टोपी, रुमाल आणि गॉगलचा वापर करावा, असे सांगण्यात आले. आकाश निरभ्र असल्याने सांगलीकरांना ‘शून्य सावली दिवस’ची ही दुर्मिळ घटना स्पष्टपणे अनुभवता आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.