'नीट' पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील मुख्याध्यापिकेला अटक
पुणे : खरा पंचनामा
'नीट-यूजी २०२६' पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार (रा. सदाशिव पेठ) हिला अटक केली असून, त्यांची राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन मनीषांना अटक करण्यात आली होती; या अटकेनंतर 'मनीषा' नावाच्या त्या तिसऱ्या आरोपी ठरल्या आहेत.
सीबीआयच्या तपासात हवालदार ही 'नीट-यूजी २०२६'च्या प्रक्रियेशी थेट संबंधित असल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती तिच्याकडे उपलब्ध होती. एप्रिल २०२६ दरम्यान तिने भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न सहआरोपी प्रा. मनीषा मांढरे हिच्यासोबत शेअर केल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान तिने दिलेले प्रश्न आणि प्रत्यक्ष 'नीट' मधील प्रश्न जुळल्याचे निष्पन्न झाल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
यापूर्वी सीबीआयने पुण्यातील ब्यूटीपार्लर चालक मनीषा वाघमारे, रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्रा. पी. व्ही. कुलकर्णी आणि मॉडर्न महाविद्यालयातील जीवशास्त्राची शिक्षिका मनीषा मांढरे हिला अटक केली होती. कुलकर्णीच्या चौकशीतूनच मांढरेचा सहभाग उघडकीस आला होता. मांढरे ही वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिका प्रक्रियेशी संबंधित असल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. तिने विद्याथ्यांना प्रश्न आणि संभाव्य उत्तरांची माहिती पुरवल्याचा आरोपही सीबीआयने केला आहे. आता हवालदारच्या अटकेनंतर भौतिकशास्त्र विषयातील प्रश्न गळतीच्या तपासालाही अधिक गती आली आहे. चौकशीतून आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनीषा हवालदार ही येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होती. याचप्रमाणे मांढरे हिचेही सेवेचे शेवटचे काही महिने उरले होते. 'या दोन्ही मनीषा एकमेकांना ओळखत होत्या; तसेच त्यांच्या भेटीदेखील होत असत,' अशी माहिती सूत्रांनी दिली.
नीट पेपरफुटी प्रकरणात शेठ हिरालाल सराफ प्रशालेची मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हिचे नाव समोर आल्यानंतर विद्या प्रसारिणी सभेने हवालदारवर निलंबनाची कारवाई केली असून, पुढील चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, '१०३ वर्षांची परंपरा असलेल्या विद्या प्रसारिणी सभेने नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले आहे. अशा प्रकारच्या गैरकृत्याला संस्थेचा कोणताही पाठिंबा नाही,' असे स्पष्ट करण्यात आले आहे. 'या प्रकरणाशी संस्था किंवा शाळेचा कोणताही संबंध नसून, संबंधित शिक्षिकेच्या वैयक्तिक कृतींसाठी संस्थेला जबाबदार धरता येणार नाही; असेही म्हटले आहे. निरपराध शिक्षक, कर्मचारी आणि विद्याथ्यांची बदनामी होऊ नये, अशी अपेक्षाही संस्थेकडून व्यक्त करण्यात आली.
सीबीआयने पुणे, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, लातूर, दिल्ली आणि अहिल्यानगरसह देशातील विविध भागांत छापेमारी केली आहे. यात आतापर्यंत ११ आरोपींना अटक केली असून, लॅपटॉप, मोबाइल फोन, बैंक व्यवहारांची कागदपत्रे आणि अन्य इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. या रॅकेटमधील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सीबीआयच्या पथकाने शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि वाघमारे यांच्याकडे केलेल्या चौकशीत मनीषा हवालदार हिच्याबाबतची माहिती मिळाली होती. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने शुक्रवारी सकाळीच शेठ हिरालाल सराफ प्रशालेत छापेमारी केली. हवालदार हिला ताब्यात घेऊन त्यांच्या संगणकाची हार्ड डिस्क व अन्य साहित्य सीबीआयने जप्त केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.