एकनाथ शिंदे यांच्या जुन्या लाडक्याना ठाणे पोलीस दलात नव्या नियुक्त्या!
ऐनवेळेस बदल्या रद्द करुन पुन्हा नियुक्ती
ठाणे : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रभाव क्षेत्र असणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि काही बदल्या राज्य सरकारने गुरुवारी रात्री केल्या.
विशेष म्हणजे, या नव्या नियुक्त्यांमध्ये ठाणे आणि परिसरात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले अथवा काही वर्षांपुर्वीच बदली होऊन इतरत्र गेलेल्या त्याच अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. काही अधिकाऱ्यांच्या तर बदलीचे आदेश २४ ते ४८ तासात बदलून त्यांना पुन्हा ठाण्यात नियुक्ती देण्यात आली आहे. यातील बहुसंख्य अधिकारी हे शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांचे गळ्यातील ताईत (लाडके) समजले जात हे विशेष.
मुंबईपेक्षा ठाणे पोलीस आयुक्तालयात मोक्याच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी गेल्या काही वर्षांपासून पोलीस दलात कमालिची स्पर्धा दिसून येते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि त्यानंतरच्या काळात थेट मुख्यमंत्री पद आले. या काळात ठराविक पोलीस अधिकाऱ्यांनी ठाण्यात आपला जम बसविल्याचे पहायला मिळते. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद आल्यानंतर यापैकी काही अधिकाऱ्यांचे ठाणे प्रेम कमी होईल आणि त्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात सेवेसाठी पाठविले जाईल अशी शक्यता पोलीस दलात व्यक्त केली जात होती.
गुरुवारी दिवसभर झालेल्या बदल्या पहाता ठाण्यातील काही जुन्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी पदोन्नतीने तर दोन-चार वर्षांपुर्वी ठाणे-पालघर बाहेर गेलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा ठाण्यात आणले गेल्याने ठाणे पोलीस आयुक्तालय आता ठराविक पोलीस अधिकाऱ्यांची मक्तेदारी बनल्याचे चित्र यानिमीत्ताने पुढे आले आहे.
ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेत अपर पोलीस आयुक्तपदी असलेल्या पंजाबराव उगले यांची बदली काही दिवसांपुर्वी पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंहामंडळाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली होती. गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस आयुक्तपद हे तसे प्रभावी मानले जाते. याठिकाणी उगले दोन वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. त्यामुळे त्यांची बदली अपेक्षीत मानली जात होती. असे असताना आठवडाभरापुर्वी झालेली बदली रद्द करण्यात उगले यशस्वी ठरले असून त्यांना गुन्हे अन्वेषण शाखेत अपर पोलीस आयुक्त हे पद उन्नत करुन देण्यात आले आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात झाली होती. तेव्हापासून त्यांची नेमणूक ठाणे जिल्ह्यातच आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची नियुक्ती नुकतीच मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी झाली होती. साधारण पाच वर्षांपुर्वी ठाण्यात असलेले बाळासाहेब पाटील यांची महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालघर जिल्ह्यात पोलीस अधिक्षकपदी नियुक्ती झाली होती. शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडाचा प्रवास याच पालघरमार्गे सुरतच्या दिशेने झाला होता. त्यामुळे शिंदे आणि बाळासाहेब यांच्यातील मधुर संबंधांची चर्चा सातत्याने होत राहीली. याच काळात राज्यात मोठा बनावट कॉल सेंटर घोटाळा झाला. त्याची पाळेमुळे आधी पालघर आणि नंतर थेट नाशीक जिल्ह्यापर्यत पोहचली. याच काळात बाळासाहेब नाशीकचे पोलीस अधिक्षकही होते. नाशीकमध्ये येत्या काळात कुंभमेळा होणार आहे. या काळात बाळासाहेब तेथे नकोत अशी भूमीका राज्यातील एका वरिष्ठ मंत्र्याने घेतल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांची मुंबईत बदली करण्यात आली. मात्र तेथे ते रुजू झाले नव्हते. त्यानंतर त्यांची नियुक्ती आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्तपदी करण्यात आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होण्यापूर्वी बाळासाहेब पाटील यांनी ठाणे शहर पोलीस दलात वाहतुक विभागात उपायुक्तपदी होते.
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक विनयकुमार राठोड यांची देखील नियुक्ती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी झाली आहे. विनयकुमार राठोड यांनी देखील छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षकपदी बदली होण्यापूर्वी ठाणे शहर पोलीस दलात वाहतुक शाखेच्या उपायुक्तपदाची धूरा सांभाळली होती. त्यामुळे राठोड यांनीही बदल्यांच्या वर्तुळात ठाणे मिळविण्यात बाजी मारली आहे.
भिवंडी परिमंडळात उपायुक्तपदी असलेल्या शशिकांत बोराटे यांची बदली नुकतीच राज्य पोलीस नियंत्रण कक्षात पोलीस अधीक्षकपदी झाली होती. ही बदलीही आठवडाभरात रद्द करण्यात आली असून त्यांना पुन्हा ठाणे पोलीस दलात आणण्यात आले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांची बदली नवी मुंबईत झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्याचे मुळ असलेले अमरसिंग यांची बदली आदेश २४ तासात रद्द करण्यात आला असून ते पुन्हा ठाण्यात रुजू झाले आहेत. आधी ठाणे, मग अंबरनाथ, लगतच्या नवी मुंबईत उपायुक्त पदी काम केलेले विवेक पानसरे यांची नियुक्ती देखील ठाणे शहर पोलीस दलात झाली. शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात पानसरे हे त्यांचे निकटवर्तीय म्हणून पोलीस दलात ओळखले जात हे विशेष.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.