वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना सहायक अधीक्षकास अटक
सांगली एसीबीची साताऱ्यात कारवाई : उपाधीक्षक इनामदार
सांगली : खरा पंचनामा
तक्रारदाराच्या वडिलांचे वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी 33 हजार रुपये लाचेची मागणी करून तीस हजारांची लाच घेताना सातारा जिल्ह्यातील काशीळ ग्रामीण रुग्णालयाच्या सहायक अधीक्षकास रंगेहात पकडून अटक करण्यात आली. सातारा सिव्हिल हॉस्पिटल येथे सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांनी दिली.
श्रीनिवास गजानन जोशी (वय 52, सहाय्यक अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय काशिळ, जि.सातारा,वर्ग -3, प्रतिनियुक्ती - जिल्हा रुग्णालय सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तक्रारदार हे शासकीय नोकर असून त्यांच्या वडीलांना औषध उपचाराकरीता वेदांत हेल्थ केअर सेंटर, सातारा या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील औषधोपचाराचे बिल 1 लाख 14 हजार 631रूपये व 23 हजार 722 झाले होते. त्यानंतर तक्रारदार यांचे वडीलांना पुढील औषधोपचारा करीता साईअमृत मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल, सातारा या ठिकाणी अंतरूग्न म्हणून दाखल करण्यात आले. साईअमृत मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल येथील औषधोपचाराचे बिल 3 लाख 23 हजार 672 रूपये झाले होते. तक्रारदार यांचे वडीलांना पुन्हा त्रास होवू लागल्याने अधिक औषधोपचारा करीता जरग हॉस्पीटल, सातारा या ठिकाणी अंतरूग्न म्हणून दाखल करण्यात आले. जरग हॉस्पीटल येथील औषधोपचाराचे बिल 1 लाख 87 हजार 701 रूपये झाले होते. तक्रारदार यांच्या वडीलांची तीन रुग्णालयातील उपचाराची एकूण चार वैद्यकिय बिले तक्रारदार यांचे वरिष्ठ कार्यालयाने बिलामध्ये आजाराची वर्गवारी होणे करीता सिव्हील हॉस्पीटल येथे पाठवीले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी सिव्हील हॉस्पीटल सातारा येथे जावून बील मंजूरी करीता जोशी यांची भेट घेतली असता जोशी यांनी तक्रारदारास सर्व मंजूरीस आले बीलांच्या रक्कमांची बेरीज करून 20 हजार रूपये लाच मागणी केल्याचा तक्रारी अर्ज एसीबीच्या सांगली कार्यालयात दिला. तक्रारी अर्जानुसार 20 मे रोजी पडताळणी केल्यावर जोशी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांची चारही बीलांची वर्गवारी करून त्याचा अहवाल तक्रारदार यांचे वरिष्ठ कार्यालयास पाठवण्याकरिता एकूण 33 हजार रूपये लाच मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी सापळा रचून 30 हजार रुपयांची लाच घेताना सिव्हील हॉस्पीटल सातारा येथील पहिल्या मजल्यावरील वैद्यकीय बिल रूम नं. 22 ब या कक्षात पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणेत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करणेची कारवाई चालू आहे.
सांगली एसीबीच्या पोलीस उपाधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक योगेश चव्हाण, अंमलदार धनंजय खाडे, अजित पाटील, सुदर्शन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.