खरात प्रकरणातून सुटका करण्यासाठी करोडोंची रक्कम? आर्थिक रॅकेट कोण चालवतंय?
मुंबई : खरा पंचनामा
महिलांचे लैंगिक शोषण आणि भक्तांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांच्याकडून लुटलेले पैशांच्या प्रकरणात नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात सध्या विविध गुन्ह्यांखाली पोलिसांच्या ताब्यात आहे.
या प्रकरणात अनेक राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस दलातील अधिकारी, प्रशासनातील बडे चेहरे सहभागी असल्याची शक्यता पहिल्यापासूनच बोलून दाखवली जात आहे. परंतु या प्रकरणात नाव बाहेर येऊ नये, यासाठी आर्थिक रॅकेट चालवले जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
अशोक खरात याच्या नाशिकच्या मिरगावातील काळ्या कृत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. श्रीमंत भक्तांना भुलवून त्यांच्याकडून लाखो रूपये उकळून, शेकडो महिलांचे लैंगिक शोषण करण्याचा कारनामे त्याने केले. त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. याच प्रकरणात गेल्या दीड-दोन महिन्यांपासून अशोक खरात तुरूंगात आहे. विशेष पोलीस पथकाकडून त्याची चौकशी सुरू आहे. अशोक खरात याच्या दरबारात राजकारणी, प्रशासनातील बडे अधिकारी, उद्योजक असे समाजातील प्रतिष्ठित लोक जात असल्याचे समोर आले. यांच्यातीलच काही लोक या प्रकरणात आपले नाव येऊ नये यासाठी पैशांचा व्यवहार करीत असल्याचे रोहित पवार म्हणाले.
भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक मोठे नेते, अधिकारी, व्यावसायिक अडकले असून त्या प्रकरणातील एक टक्के सत्य देखील समोर आलेले नाही. समोर जे काही आले आहे ते केवळ छोटे मासे आहेत. यामध्ये अनेक मोठे मासे देखील असून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून हे प्रकरण नोंद होणार आहे. या प्रकरणाच्या तपासातून सुटका करून घेण्यासाठी किंवा नाव बाजूला काढण्यासाठी एक मोठे आर्थिक रॅकेट काम करत असल्याची माहिती समजत आहे.
मोठमोठ्या रकमा घेऊन अनेकांना यातून अलगद बाहेर काढले जात आहे. ज्यांना या प्रकरणातून बाहेर काढायचे आहे त्यांना भोंदू विरोधात फसवणूक केल्याची तक्रार करायला सांगितले जाते आणि या प्रकरणातून बाहेर काढले जाते अशी ही पद्धत असल्याची माहिती आहे, असे गंभीर आरोप रोहित पवार यांनी केले. रोहित पवार यांच्या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
मी केलेल्या आरोपांची किंबहुना माहितीची शहानिशा करून मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कारवाई करून या प्रकरणातील सत्य समोर आणावे, अशी विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.