गावठी पिस्तूलातून गोळी सुटून प्लॉट एजन्ट जखमी : दोघांना अटक
चौघावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगली : खरा पंचनामा
इनाम धामणी येथे गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांनी पिस्तूलाची टेस्ट घेताना झालेल्या गोळीबारात प्लॉट एजन्ट जखमी झाला आहे. शनिवारी रात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
समर्थ संजय गायकवाड (वय २२, रा. हाडको कॉलनी, मिरज) व जखमी अदित्यकुमार याचा मित्र शिवतेज सुहास सावंत (३०, कर्नाळ) अशी अटक केलेल्या त्या दोघांची नावे आहेत. सुजल भोसले (रा. मिरज) हा पसार झाला आहे. यातील समर्थ गायकवाड हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मोकातून जामिनावर बाहेर आला आहे.
पिस्तूल चालू स्थितीत आहे की नाही, याची ट्रायल समर्थ गायकवाड याने घेतली. त्यातून हा गोळीबार झाल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस अंमलदार विष्णू काळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अदित्यकुमार नाईक आणि शिवतेज सावंत हे दोघे मित्र आहे. दोघेही प्लॉट एजंट आहेत. त्यांना गावठी कट्टा घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी समर्थ गायकवाड याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काल सायंकाळी पिस्तूल दाखवण्यासाठी समर्थ गायकवाड आणि सुजल भोसले येणार होते. त्यासाठी अदित्यकुमार आणि त्याचा मित्र शिवतेज सावंत हे दोघे चारचाकी (एमएच १० ईई ००६५) मधून आले.
धामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजसमोरील अंकली फाटा येथे चौघेही पावणे सातच्या सुमारास आले. त्यावेळी समर्थ गायकवाड हा गाडीत बसला. पिस्तूल चालू स्थितीत असल्याची खात्री करून देण्यासाठी पिस्तूल लोड केली. त्यावेळी अचानक त्यातून गोळीबार झाला. त्यातील गोळी अदित्यकुमार याच्या पोटात घुसली. दोन राऊंड फायर झाल्याने खळबळ उडाली. जखमी अदित्यकुमार याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गोळीबाराची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. अपर अधीक्षक कल्पना बारवकर, उपाधीक्षक संदीप भागवत, ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक भैरू तळेकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पथक दाखल झाले. ग्रामीण पोलिसांच्या पथकाने तातडीने दोघांना अटक केली.
समर्थ गायकवाड याच्याविरोधात आर्म ॲक्ट, चोरी, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोकाची कारवाई करण्यात आली होती. त्यातून तो बाहेर आला होता. त्याने ती पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणल्याची कबुली दिली आहे.
कारवाईत निरीक्षक तळेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, नितीन बाबर, ईस्माइल तांबोळी, सहायक फौजदार मेघराज रूपनर, अवधुत भाट, बंडु पवार, अभिजीत पाटील, विष्णू काळे, धीरज यादव, रमेश पाटील, रणजित घार्गे, मनोज निळकंठ, हिंमत शेख, मनोज वाघमोडे, सुनील शिंदे, रोहित साखरे, भारत कुंठे यांचा सहभाग होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.