Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तबपुणे, सांगली-सातारा राष्ट्रवादीकडे : दोन जागांवर घोडे अडले

मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब
पुणे, सांगली-सातारा राष्ट्रवादीकडे : दोन जागांवर घोडे अडले 

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याचं चित्र समोर आलं आहे.

आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत महाविकास आघाडीने 17 पैकी 15 जागांवर एकमत साधल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या प्राथमिक फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र, नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर अद्यापही पेच कायम असल्याचं सांगितलं जात आहे. या दोन्ही जागांवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी दावा ठोकल्यामुळे अंतिम निर्णय पुढील दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला 8 जागा देण्यात आल्या आहेत. काँग्रेस चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर आणि नागपूर पोटनिवडणुकीची जागा लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्याला 4 जागा आल्या असून रत्नागिरी, जळगाव आणि परभणी-हिंगोली या मतदारसंघांमध्ये ठाकरे गट उमेदवार देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 3 जागा आल्या असून पुणे, ठाणे आणि सातारा-सांगली या मतदारसंघांवर पक्ष दावा करणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, "या निवडणुकीला आम्ही एकत्रितपणे महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार आहोत. उर्वरित दोन जागांबाबत चर्चा सुरू असून लवकरच त्यावर सन्मान्य तोडगा निघेल." स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगणार असल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता उर्वरित दोन जागांवर कोणता पक्ष माघार घेतो आणि महाविकास आघाडीचा अंतिम फॉर्म्युला काय ठरतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.