NEET पेपरफुटी प्रकरण : पत्नी जेलमध्ये, आता पती रडारवर !
पुणे : खरा पंचनामा
देशभरात गाजलेल्या NEET पेपर फुटी प्रकरणाच्या चौकशीला आता कमालीचा वेग आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आपला तपास थेट पुण्यात केंद्रित केला आहे.
CBI च्या हाती लागलेल्या ताज्या धागेदोऱ्यांनुसार, या महाघोटाळ्यात पुण्यातून अटक करण्यात आलेल्या एका आरोपी महिलेच्या पतीचा थेट सहभाग असल्याचे समोर आले आहे. या नव्या माहितीमुळे शिक्षण वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NEET पेपर फुटी प्रकरणी CBI ने यापूर्वीच पुण्यातून मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि मनीषा हवलदार या तिघींना अटक केली आहे. या तिन्ही मनीषांसह शिवराज मोटेगावकर आणि इतरांची सीबीआयने कसून चौकशी केली आहे. या चौकशीत आणि तांत्रिक तपासात आता यातील एका मनिषाच्या पतीचे नाव समोर आले आहे. हा पती या संपूर्ण रॅकेटमध्ये पडद्यामागून मोठी सूत्रे हलवत होता आणि उमेदवारांशी आर्थिक व्यवहार करत होता, असा संशय CBI ला आहे.
CBI आता या प्रकरणाच्या मूळ साखळीपर्यंत पोहोचण्यासाठी अॅक्शन मोडमध्ये आली आहे. पुण्यातून समोर आलेल्या या संशयित पतीला तातडीने दिल्लीतील CBI मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. दिल्लीत या पतीची आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
मूळ रॅकेटचे जाळे पुणे आणि महाराष्ट्रात कुठे-कुठे पसरले आहे, तसेच पेपर मिळवण्यासाठी नक्की किती कोटींची डील झाली होती, याचा उलगडा या पतीच्या चौकशीतून होण्याची दाट शक्यता आहे. या चौकशीनंतर पुणे आणि राज्यातील काही शिक्षण संस्थांचे चालक आणि एजंट CBI च्या रडारवर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.