NEET पेपरफुटी प्रकरण; RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात

लातूर : खरा पंचनामा 

संपूर्ण देशात खळबळ उडवणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लातूरमधील नामांकित RCC कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावर यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे.

लातूर आणि पुण्यातल्या चौकशीनंतर मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात आले आहेत. मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी 'लातूर पॅटर्न' म्हणून संपूर्ण देशात सर्वश्रुत आहे. याच लातूरमधील पेपरफुटीच्या कनेक्शनचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल 28 अधिकाऱ्यांचं पथक दाखल झालं होतं. या पथकानं शिवराज मोटेगावकर यांची तब्बल 8 ते 10 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना पुण्यात सीबीआय ऑफिसला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. आज ते पुण्यात हजर झाल्यानंतर अखेर सीबीआयनं त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मोटेगावकर यांचं नाव सीबीआयच्या रडारवर कसं आलं? याचाही एक मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातून लातूरमधीलच पी. व्ही. कुलकर्णी यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. कुलकर्णी यांच्या कसून केलेल्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचं नाव समोर आलं होतं. त्यानुसार सीबीआयनं चक्रं फिरवली अन् त्यांची चौकशी केली. त्यानंतर आता त्यांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पहायला मिळत आहे.

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नांदेडपर्यंत येऊन पोहोचले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या CBIच्या एका विशेष पथकाने शनिवारी नांदेडमध्ये धडक कारवाई केली. शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विद्युतनगर भागातील एका संशयित कुटुंबाच्या घरावर छापा टाकत सीबीआयने तब्बल 7 ते 8 तास कसून चौकशी केली. धक्कादायक म्हणजे सदर कुटुंबीय आपल्या मुलीसाठी लाखो रुपयात नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय आहे. याच संशयावरुन सीबीआयच्या पथकाने छापा टाकून झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, या कारवाईमुळे नांदेडच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.