शुभम खैरनारने कसं चालवलं NEET प्रश्नपत्रिकेचं रॅकेट?
'माफिया' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मोबाईलऐवजी...
मुंबई : खरा पंचनामा
NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा झाला असून नाशिकमधील आरोपी शुभम खैरनार याला अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांनी दिलेल्या गुप्त माहितीनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट २ ने ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव शुभम खैरनार असून त्याला आता सीबीआयच्या ताब्यात देण्यात आले आहे.
शुभम खैरनार हा नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आहे. मंगळवारी दुपारी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने केस कापून आपला चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांनी जुन्या छायाचित्रांची तुलना आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने त्याची ओळख पटवली.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुभम खैरनारने पुण्यातील एका संशयिताकडून १० लाख रुपयांत प्रश्नपत्रिका विकत घेतली होती. त्यानंतर ती हरियाणातील एका व्यक्तीला १५ लाख रुपयांना विकून ५ लाखांचा नफा कमावल्याचा आरोप आहे. हा व्यवहार एनक्रिप्टेड मेसेंजर अॅपद्वारे झाल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
पोलिस तपासात असेही समोर आले की, प्रश्नपत्रिका मोबाईलने स्कॅन करण्यात आलेली नव्हती. पकड टाळण्यासाठी आरोपींनी हाय-डेफिनिशन पोर्टेबल स्कॅनरचा वापर केला होता. यानंतर स्कॅन केलेल्या प्रती टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपसारख्या अॅप्सवरून शेअर करण्यात आल्या.
या प्रकरणामागे मोठे देशव्यापी रॅकेट कार्यरत होते. मनीष यादव हा या नेटवर्कचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे, तर राकेश मांडवारिया याच्यावर प्रश्नपत्रिका वितरित केल्याचा आरोप आहे.
राजस्थान एसओजीने या दोघांसह आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. मनीष यादवला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांना 'प्रायव्हेट माफिया' नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप सापडला. या ग्रुपमध्ये प्रश्न पत्रिका मोठ्या प्रमाणात शेअर होत होती.
या प्रश्नपत्रिकेसाठी ५ हजार ते ३० हजार रुपये घेतले जात होते. अनेक विद्यार्थ्यांनी पैसे देऊन ही प्रश्नपत्रिका घेतली, तर काहींनी ती इतरांना मोफत पुढे पाठवली असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हस्तलिखित अंदाजपत्रिकेतील १५० पैकी तब्बल १२० प्रश्न मूळ जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेशी जुळले होते.
या अंदाजपत्रिकेमध्ये एकूण ४१० प्रश्न आणि त्यांची उत्तरे होती. ही प्रश्नपत्रिका कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, नाशिकहून प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी हरियाणाला पाठवण्यात आली होती. तिथे तिच्या प्रती तयार करून पुढे वितरित करण्यात आल्या राजस्थानमधील सीकर येथील काही कोचिंग सेंटरमध्ये परीक्षा होण्याच्या महिनाभर आधीपासून हे साहित्य उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, National Testing Agency ने ३ मे रोजी झालेली NEET-UG 2026 परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षेला देशभरातून २२ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता CBI मार्फत केली जात असून देशभरातील अनेक राज्यांमध्ये तपासाचा विस्तार करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.