एकाच कुटुंबातील ५ जणांचं NEET परीक्षेत यश, पोस्टनंतर चक्रं फिरली; कुटुंबातल्या तिघांना अटक
जयपूर : खरा पंचनामा
मागील वर्षी ज्या बिनवाल कुटुंबातील पाच मुलांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी निवड झाली होती, त्याच कुटुंबावर यंदा मुलासाठी पैसे देऊन 'नीट'चा पेपर खरेदी केल्याचा आरोप झाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शिक्षण आणि परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जमवा रामगड येथील बिनवाल कुटुंबाचे अनेक वर्षांपासून वैद्यकीय प्रवेश परीक्षा व्यवस्थेशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तपास केवळ यंदाच्या पेपरफुटीपुरता मर्यादित न राहता मागील काही वर्षांतील निवड आणि प्रक्रियेचाही शोध घेतला जात आहे. सोशल मीडियावर सहा नोव्हेंबर २०२५ रोजी केलेली पोस्ट तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचा पुरावा ठरत आहे.
या पोस्टमध्ये दिनेश बिनवाल यांनी त्यांच्या कुटुंबातील पाच मुलांची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये निवड झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. मात्र आता त्याच पोस्टमुळे संशय निर्माण झाला आहे. या कुटुंबातील मांगीलाल बिनवाल, दिनेश बिनवाल आणि एमबीबीएस विद्यार्थी विकास बिनवाल यांना नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आली असून, तिघांनाही 'सीबीआय'ने दिल्लीला नेले आहे.
यासंदर्भात बोलताना, समाजात नैतिकता असती तर 'नीट' सारख्या राष्ट्रीय परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली नसती. रामराज्य म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर न्याय आणि नैतिक मूल्यांवर आधारित समाज आहे, अशी प्रतिक्रिया राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी दिली.
दरम्यान, रद्द करण्यात आलेली नीट यूजी परीक्षा आता २१ जून रोजी होणार आहे. एनटीएकडून फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज भरण्याची किंवा नोंदणी करण्याची गरज नाही. तसेच अतिरिक्त शुल्क भरण्याचीही गरज नाही. उलट आधी भरलेले शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले जाणार आहे. फेरपरीक्षेचा खर्च 'एनटीए' करणार आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एनटीएकडून हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.