काल रात्री फाईलवर सही केली!
100 टक्के इथेनॉल इंधनाला कायदेशीर मान्यता देत गडकरींची मोठी घोषणा

नागपूर : खरा पंचनामा 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या इंधनाला कायदेशीर मान्यता देण्यात आल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे देशाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

गडकरी यांनी सांगितले की, शनिवारी रात्री त्यांनी 100 टक्के इथेनॉल इंधनासंबंधी नियमावलीला अंतिम मंजुरी देणाऱ्या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. त्यामुळे आता या इंधनाच्या वापरला कायदेशीर मान्यता मिळाली असून त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाला आयातीत इंधनावरील अवलंबित्वातून मुक्त करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

भारत सध्या पेट्रोलियम इंधनाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. यासाठी दरवर्षी सुमारे 22 लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. इथेनॉलचा वापर वाढल्यास हा आर्थिक भर कमी होण्यास मदत होईल. तसेच देशांतर्गत उपलब्ध संसाधनांपासून इंधननिर्मितोला चालना मिळेल आणि ऊर्जा सुरक्षा देखील अधिक बळकट होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मते, इथेनॉल हे केवळ पेट्रोलला पर्याय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे साधन देखील ठरू शकते. ऊस, मका आणि इतर कृषी उत्पादनांपासून इथेनॉल तयार होत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होईल. कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये नवे रोजगार निर्मण होतील आणि देशातील आर्थिक चक्र अधिक मजबूत होईल.

100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांच्या उपलब्धतेबाबत बोलताना गडकरी यांनी सांगितले की, अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी या दिशेने महत्त्वाची पावले उचलली आहेत. इथेनॉलवर चालणाऱ्या नव्य चारचाकी वाहनाचे उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, काही दुचाकी वाहने आधीच बाजारात उपलब्ध आहेत. पुढील काही महिन्यांत आणखी अनेक कंपन्या पूर्णपणे इथेनॉलवर चालणारी वाहने ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इथेनॉलच्या वापराबाबत सुरुवातीला अनेक शंका आणि गैरसमज निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. काही जणांनी इथेनॉलमुळे वाहनांचे नुकसान होते, अशी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात एक अनुभव सांगताना गडकरी म्हणाले की, एका व्यक्तीने त्यांना फोन करून आपल्या वाहनात बिघाड झाल्याचे आणि त्याला इथेनॉल कारणीभूत असल्याचे सांगितले होते. मात्र चौकशी केल्यानंतर ते वाहन डिझेलवर चालणारे असल्याचे समोर आले. डिझेलमध्ये इथेनॉलचा वापरच होत नसताना अशा प्रकारचे दावे कसे केले जातात, यावरून चुकीची माहिती पसरवण्याचे प्रयत्न दिसून येतात, असे त्यांनी नमूद केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.