मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल !
महाराष्ट्रातील 4 नवे चेहरे थेट मोदींच्या कॅबिनेटमध्ये; दोघांचा पत्ता कट; चर्चेतील 6 जण कोण?
नवी दिल्ली : खरा पंचनामा
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये सुरु असलेल्या घडामोडी, गुरुवारी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूची घेतलेली भेट अन् केंद्रीय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
विशेष म्हणजे या फेररचनेमध्ये आणि मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातील अनेक नावं चर्चेत असून विद्यामान मंत्र्यांपैकी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची उचलबांगडी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याचवेळी अनेक नावांचा दिल्लीतील वरिष्ठांकडून विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार येत्या दोन-तीन दिवसांत होण्याची सूत्रांची माहिती असून त्या दृष्टीने हलचाली सुरु झाल्या आहेत. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये महाराष्ट्रातून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला 6 खासदार एनडीएमध्ये आणल्याचं बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालय कायम राहण्याची शक्यता असून आरोग्य राज्यमंत्रीपद शिवसेनेतील दुसऱ्या चेहऱ्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये कल्याणचे खासदार आणि एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे ठाकरेंची साथ सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणाऱ्या सहा खासदारांपैकी एक असलेले धाराशीवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. ओमराजेंना राज्यमंत्रीपद मिळू शकतं असं सांगितलं जात आहे.
केवळ शिवसेनाच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसलाही मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून पार्थ पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे एकही केंद्रीय मंत्रिपद नाही.
भाजतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातून विनोद तावडे यांच्या नावाचीही केंद्रीय मंत्रिपदासाठी चर्चा असल्याचं समजतं. मात्र त्याचवेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. रक्षा खडसे यांच्या नावाची चर्चा पत्ता कट झालेल्यांमध्ये असली तरी महिला आरक्षण विधेयकानंतर मिळालेल्या महत्त्वामुळे त्यांना कायम ठेवले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
महाराष्ट्रातून चर्चेत असलेल्या नावांची यादी खालीलप्रमाणेः
श्रीकांत शिंदे
ओमराजे निंबाळकर
पार्थ पवार
विनोद तावडे
मुरलीधर मोहोळ (पद जाण्याची शक्यता)
रक्षा खडसे (पद जाण्याची शक्यता)
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.