Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई२ किलो ३०५ ग्रॅम गांजासह एकाला अटक!

मिरज ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
२ किलो ३०५ ग्रॅम गांजासह एकाला अटक!

पूजा फडके 
मिरज : खरा पंचनामा 

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी मोहिमेतर्गत पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. एका इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल २ किलो ३०५ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ६ जून रोजी सुभाषनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी महादेव सिताराम शिंदे (वय ४०, रा. बेवनूर, ता. जत, जि. सांगली)  या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट (NDPS Act) कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

यानुसार, ६ जून रोजी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ आणि त्यांचे पथक सुभाषनगर परिसरात पेट्रोलिंग करत होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक वाघ यांना एका बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, एकजण पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गांजा घेऊन थांबला आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून संशयित आरोपी महादेव शिंदे याला ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याच्याकडील पुठ्ठ्याचा बॉक्स उघडून पाहिला असता, त्यात निळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत हिरवट-काळपट रंगाचा, पाने, फुले व खोड असलेला २ किलो ३०५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी ५७ हजार ६२५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला जेरबंद केले आहे.


ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक पांडुरंग मुंढे, रावसाहेब सुतार, अमोल ढोले, पोहेकॉ हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, विकास भोसले, राहुल देशमुख, दिपाली केंद्रे, रामचंद्र शिंदे आणि स्वप्नील भोसले यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.