दिल्लीत पार्थ पवारांचं राजकीय वजन वाढलं !
मोदी सरकारने सोपवली अत्यंत महत्त्वाची जबाबदारी
नवी दिल्ली : खरा पंचनामा
राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यावर केंद्र सरकारने महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच त्यांची संरक्षणविषयक संसदीय स्थायी समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अडीच महिन्यांपूर्वीच राज्यसभेत प्रवेश केलेल्या पार्थ पवारांना मिळालेल्या या संधीमुळे दिल्लीत त्यांचे वजन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे लोकसभा खासदार राधा मोहन सिंह हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. राज्यसभेचे सदस्य म्हणून पार्थ पवार या समितीवर काम पाहणार असून, संरक्षण मंत्रालयाचे अर्थसंकल्प, संरक्षण धोरणे, भारतीय सैन्यदलांचे कामकाज, स्वदेशी संरक्षण प्रकल्प, डीआरडीओचे संशोधन तसेच संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण अशा महत्त्वाच्या विषयांचा आढावा घेण्याची जबाबदारी या समितीकडे आहे.
या समितीत पार्थ पवार यांच्यासह राज्यसभेतील अशोक कुमार मित्तल, दामोदर राव दिवकोंडा, दर्शना सिंह, अभिनेते कमल हासन आणि नरेश बंसल यांचाही समावेश करण्यात आला आहे. समितीत लोकसभेचे २१ आणि राज्यसभेचे १० सदस्य असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचाही त्यात समावेश आहे. या समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असेल.
भारतीय संसदेत एकूण २४ विभागीय संबंधित स्थायी समित्या असून, त्यापैकी संरक्षणविषयक समिती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अर्थसंकल्पातील तरतुदींची छाननी, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि कोस्ट गार्डच्या कामकाजाचा आढावा, डीआरडीओ प्रकल्प, 'आत्मनिर्भर भारत' अंतर्गत संरक्षण क्षेत्रातील उपक्रम तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासंबंधीच्या योजनांवर ही समिती लक्ष ठेवते. समिती सरकारला शिफारसीही करते आणि त्यावर झालेल्या कारवाईचा अहवाल मागवते.
पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना राज्यसभा पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली आणि मार्च २०२५ मध्ये ते राज्यसभेवर निवडून गेले. ९ एप्रिल रोजी त्यांनी उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते खासदार म्हणून शपथ घेतली होती. आता संरक्षणविषयक संसदीय समितीवर नियुक्ती झाल्याने त्यांच्या संसदीय कारकिर्दीला महत्त्वाचे वळण मिळाल्याचे मानले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.