पुणे विद्यापीठातील मध्यवर्ती भोजनगृहाचा अन्न परवाना रद्द
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
पुणे : खरा पंचनामा
अन्न आणि औषध प्रशासनाचे धडक कारवाईचे सत्र राज्यात वेगाने सुरू असून, पुण्यात पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आली आहे. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
या धडक आदेशानंतर विद्यापीठातील 'मेस तात्काळ बंद करण्यात आली असून, कंत्राटदाराविरुद्ध कठोर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले आहे. या भोजनगृहाची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी १६ जून रोजी तपासणी केली.
संबंधित भोजनगृहाबाबत समाजमाध्यमांवरून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान या मध्यवर्ती भोजनगृहात पाण्याच्या गुणवत्तेच्या नोंदी न ठेवणे, अन्न शिजवताना व साठवताना कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे, तापमानाचे नियंत्रण न राखणे आणि संपूर्ण परिसरात कमालीची अस्वच्छता असणे अशा अन्न सुरक्षेच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा निष्काळजीपणाची दखल घेत आयुक्त मुंढे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि परिसरात आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएने कारवायांचा प्रचंड धडाका लावला आहे. दोनच दिवसांपूर्वी स्वारगेट बस स्थानकावरील एका कॅन्टीनमध्ये उघड्यावरील अन्नपदार्थ आणि तुटलेल्या, काळवंडलेल्या फरश्या अशा अत्यंत अस्वच्छ परिस्थितीमुळे ते केंद्र थेट सील करण्याचे आदेश देण्यात आले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.