गोव्यातील बनावट विदेशी दारू साठ्यासह तरुण अटकेत
सांगलीतील राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत १ लाख ३३ हजारांचा माल जप्त
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
गोवा राज्यात तयार होणाऱ्या बनावट विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या एका इसमावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज पथकाने धडक कारवाई केली आहे. मिरज येथील नवीन वसाहत, उत्तर शिवाजी नगर भागात टाकलेल्या छाप्यात एकूण १ लाख ३३ हजार ३५० रुपये किमतीचा बनावट विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
याप्रकरणी विशाल मारुती पवार (वय २८) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्काचे कोल्हापूर विभागाचे विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेश आणि मार्गदर्शनाखाली मिरज कार्यालयाच्या पथकाकडून 'हातभट्टी दारू विक्री निर्मूलन' मोहीम राबवली जात आहे.
शनिवार, ६ जून २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या समवेत हे पथक इंदिरानगर झोपडपट्टी, संजयनगर झोपडपट्टी व नवीन वसाहत परिसरात हातभट्टी दारू विक्रीवर छापे टाकत होते. यावेळी नवीन वसाहत येथील अग्निशामक दलासमोर राहणाऱ्या विशाल मारुती पवार याच्या घरावर छापा टाकला असता, तिथे गोवा राज्य निर्मित विविध ब्रँडचा विदेशी मद्याचा साठा मिळून आला.
पथकाने अधिक तपास करत त्याच्या घरासमोरील किराणा माल दुकानाची आणि घराची झडती घेतली. यावेळी १ लाख ३३ हजार ३५० रुपये किमतीच्या बनावट विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी आरोपी विशाल पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई), ८०, ८१, ८३ व ९० अन्वये गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील कायदेशीर तपास दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे करत आहेत.
सदर धडक कारवाई सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजचे निरीक्षक दीपक सुपे, दुय्यम निरीक्षक लक्ष्मण पोवार, अजय लोंढे, जयसिंग खुटावळे, तसेच जवान स्वप्निल आटपाडकर, विनायक खांडेकर, स्वप्निल कांबळे, शाहीन शेख आणि कविता सुपने यांनी केली.
प्रशासनाचे आवाहन:
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी अवैध गावठी हातभट्टी दारूचे प्राशन करू नये अथवा ती खरेदी करू नये, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही. तसेच, आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोणीही गावठी हातभट्टी दारूची निर्मिती, वाहतूक अथवा विक्री करत असल्यास, त्याबाबतची माहिती नागरिकांनी तत्काळ राज्य उत्पादन शुल्क, मिरज कार्यालयास द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.