गोव्यातून आणलेला २ कोटींचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त,
सातारा येथे राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; इंदूरच्या आरोपीला अटक
पूजा फडके
सातारा : खरा पंचनामा
परराज्यातून महाराष्ट्रात छुप्या मार्गाने होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. कोल्हापूर विभागीय भरारी पथक आणि सातारा भरारी पथक यांनी संयुक्त सापळा रचून सातारा-निरा रोडवर, लोणंद बस स्टँडसमोर तब्बल २ कोटी २४ लाख ४ हजार ३२० रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक १४ चाकी ट्रक जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, विभागीय भरारी पथक कोल्हापूर आणि भरारी पथक सातारा यांनी २० जून रोजी लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे पाळत ठेवली. यावेळी संशयास्पद वाटलेल्या अशोक लेलँड कंपनीच्या एका १४ चाकी ट्रकला (क्रमांक MH12 MV 4719) थांबवून त्याची झडती घेण्यात आली. तपासणी दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी प्लास्टिक सिरॅमिकच्या १५० गोण्यांच्या आड लपवून ठेवलेला प्रचंड मद्यसाठा आढळून आला. यामध्ये गोवा राज्यात निर्मित आणि मध्य प्रदेश राज्यात विक्रीसाठी अधिकृत असलेला खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
यात पोलंड प्राईड व्हिस्की: १८० मि.ली. क्षमतेचे ८३४ बॉक्सेस, रॉयल क्लासिक माल्ट व्हिस्की: १८० मि.ली. क्षमतेचे ६७२ बॉक्सेस,एकूण मद्यसाठा १५०६ बॉक्सेस. (ज्याची महाराष्ट्र राज्यातील किंमत सुमारे १,७१,०४,३२०/- रुपये आहे.) मद्यसाठा आणि वाहनासह एकूण २,२४,०४,३२०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आंतरराज्यीय टोळी सक्रिय असण्याची शक्यता
या प्रकरणी आरोपी महमंद शफिक रशिद शहा (वय ३१ वर्षे, रा. आसाद नगर, इंदूर, मध्य प्रदेश) याला महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलमांन्वये अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची नोंद गुन्हा रजि. क्र. ३०१/२०२६ नुसार करण्यात आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या मोठ्या तस्करीमागे एक आंतरराज्यीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही यशस्वी कामगिरी राज्य उत्पादन शुल्काचे कोल्हापूरचे उप-आयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशानुसार पार पडली. तसेच सातारा उत्पादन शुल्काचे अधीक्षक बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरचे निरीक्षक पवार, सातारा भरारी पथकाचे निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक योगेश फटांगरे व त्यांच्या पथकातील जवानांनी ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक योगेश फटांगरे करत आहेत.
जनतेला आवाहन:
राज्य उत्पादन शुल्क विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, परिसरात कुठेही अवैध मद्य निर्मिती, विक्री किंवा वाहतूक होत असल्यास विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८०० २३३४ ९९९ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ वर संपर्क साधून माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.