मिरजेतील बस स्थानकावर दागिने चोरणाऱ्या तामिळनाडूच्या महिलेला अटक
साडेदहा लाखाचे दागिने जप्त : सांगली एलसीबीची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत प्रवासी महिलांचे दागिने लुटणाऱ्या तामिळनाडूतील चोरट्या महिलेला पोलिसांनी गजाआड केले आहे. तिच्याकडून सुमारे साडेदहा लाख रुपयांचे दागिने जप्त केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
मोनीषा मणीगंडण ( वय २८, रा. जोलार पेठ, बाबूनगर, बेल्लोर, तामिळनाडू ) असे महिलेचे नाव आहे. सांगली, मिरजेसह अन्य ठिकाणच्या बस स्थानकावरील गर्दीचा फायदा घेत महिला प्रवाशांकडील मौल्यवान दागिने लुटण्याच्या घटनांमध्ये वाढच होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी संबंधित चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक मिरज येथे गस्त घालत असताना त्या पथकाला मिरज येथील शहरी बसस्थानकाच्या पाठीमागील गल्लीत एक महिला संशयस्पद रित्या थांबली असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, सहाय्यक पोलीस फौजदार सपना गराडे, सागर लवटे यांच्या पथकाने संबंधित महिलेला संशयावरून ताब्यात घेतले.
तिच्या पर्स तपासणी केली असता त्या पर्समध्ये सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने सापडले. यामध्ये मिनी गंठण, मोठे गंठण,सोन्याच्या अंगठ्या कानातील झुबे अशा दागिन्यांचा समावेश होता. संबंधित दागिन्याबाबत चौकशी केल्यानंतर तिने आपण मार्चमध्ये बसमध्ये चढणाऱ्या एका प्रवासी महिलेच्या पर्समधून हे दागिने चोरले असल्याची कबुली दिली. या चोरट्या महिलेकडून पोलिसांनी जप्त केलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे १० लाख ५२ हजार रुपये आहे. या चोरी प्रकरणी मिरजेतील महात्मा गांधी पोलीस चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने या चोरट्या महिलेला महात्मा गांधी चौक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, सहाय्यक फौजदार सपना गराडे, सागर लवटे, सागर टिंगरे, अमर नरळे, सतीश माने, विक्रम खोत, प्रतीक्षा गुरव यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.