लोहगडनंतर आता सांगलीची सिया!
प्रियकराच्या साथीने पत्नीने गळा आवळून घेतला जीव
सांगलीच्या विठ्ठलनगर येथील घटना : पत्नीसह प्रियकराला अटक
सांगली : खरा पंचनामा
पुण्याच्या लोहगडमधील घटना ताजी असतानाच सांगलीत त्याची पुनरावृत्ती झाली आहे. पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी मध्यरात्री साडेबारा ते पावणे तीनच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.
आनंद हणमंत सर्जे (वय 28) असे खून झालेल्याचे नाव आहे. पल्लवी आनंद सर्जे (वय 22, मूळ रा. गुड्डापूर, ता. जत, सध्या रा. पोळ मळा विठ्ठलनगर, सांगली), दीपक आप्पासाहेब आजमाने (वय 21, रा. बापट मळा, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मृत आनंद आणि पल्लवी यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना अडीच वर्षाचे एक मूल आहे. आनंद एका कपडाच्या दुकानात काम करत होता. आनंदचा नातेवाईक असलेला संशयित दीपकही त्याच दुकानात काम करत होते.
दीपककडे दुचाकी असल्यामुळे तो रोज कामावर जाताना आनंदला त्याच्या घरातून घेऊन जात होता. तसेच काम संपल्यावर परत घरी सोडत होता. रोज दुपारी दोघांची जेवणाची सुटी वेगवेगळ्या वेळी होत होती. दीपक सतत आनंदच्या घरी येत जात असल्यामुळे तसेच तो त्यांचा नातेवाईक असल्यामुळे त्याचा आणि पल्लवीचा चांगलाच परिचय झाला होता. यातून त्यांच्यात अनैतिक संबंध सुरु झाले.
त्या दोघांच्या संबंधाबद्दल माहिती झाल्यावर आनंद दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यातून आनंद आणि पल्लवी यांच्यात वारंवार वाद होत होते. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आनंदने पल्लवीला मारहाणही केली होती. त्यावेळी आनंद याला संपवण्याचा कट रचला आणि प्रियकर दीपक याला बोलावून घेतले. दोघांनी मिळून ओढणीने आनंद झोपेत असताना त्याचे हात पाय बांधले. नंतर गळा आवळून त्याचा खून केला.
रात्री तीनच्या सुमारास पल्लवीने आनंद काहीच हालचाल करत नसल्याचे नातेवाईकांना कळवले. नातेवाईकांनी त्याला सांगलीच्या सिव्हिलमध्ये मृत अवस्थेत दाखल केले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या मृत्यूबाबत एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे यांना शंका आल्याने त्यांनी सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांना खोलवर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. निशानदार आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक तसेच पल्लवी, दीपककडे चौकशी केल्यावर खुनाची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले.
विश्रामबागच्या सहायक निरीक्षक कविता नाईक यांनी फिर्याद दिली आहे. निरीक्षक झाडे यांना संशय आल्याने त्यांच्या टीमचे सहायक निरीक्षक निशानदार यांनी सखोल चौकशी करून खुनाच्या घटनेला वाचा फोडल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.