Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विषारी दारू प्रकरण; रसायन पुरवणाऱ्या पिता-पुत्रांना मुंबईतून अटक

विषारी दारू प्रकरण; रसायन पुरवणाऱ्या पिता-पुत्रांना मुंबईतून अटक 

पुणे : खरा पंचनामा 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विषारी दारू प्रकरणाच्या तपासात सीआयडीला मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात वापरण्यात आलेल्या रसायनांचा पुरवठा केल्याच्या आरोपावरून नवी मुंबईतील पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे विषारी दारू प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरुण जगदंब चौबे (वय 59) आणि अभिषेक अरुण चौबे (वय 34) अशी असून दोघेही नवी मुंबईतील वाशीगाव परिसरातील रहिवासी आहेत. सीआयडीच्या पथकाने त्यांना मुंबई परिसरातून ताब्यात घेतले. आरोपींना पिंपरी येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासादरम्यान सीआयडीकडून विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज, दारूचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व नमुने आणि पुरावे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून संशयित असलेल्या सिकंदर राठोड उर्फ योगेश व्हानखेडे याच्याकडून मिथेनॉल मिश्रित हातभट्टीची दारू खरेदी करून तिची विक्री केल्याचा आरोप असलेल्या आर्यन संजीव धोत्रे याच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. वडारवाडी परिसरात ही दारू विक्री केल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

विषारी दारूमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात अनेकांना जीव गमवावा लागल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणामागील पुरवठा साखळी, रसायनांचा स्रोत आणि संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीकडून सखोल तपास सुरू आहे.

या गुन्ह्याबाबत कोणाकडेही माहिती असल्यास त्यांनी सीआयडीचे पोलिस उपअधीक्षक शामराव काळे आणि सचिन चव्हाण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.