Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाशस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ४.७ लाखांच्या ७ मोटारसायकली जप्त!

सांगलीत दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ४.७ लाखांच्या ७ मोटारसायकली जप्त!

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी चोरीचे सत्र सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे. सांगली ग्रामीण, इस्लामपूर, पलूस, आष्टा आणि सातारा जिल्ह्यातील बोरगाव व तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या तब्बल ७ मोटारसायकली जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एका आरोपीसह दोन बालअपचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर या टोळीचा मुख्य सुत्रधार सध्या फरार आहे.

तेजस केदार साळुंखे (वय १८, रा. कुंभारगाव, ता. कडेगाव, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे, तर त्याच्या दोन बालअपचारी साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्यातील त्यांचा मुख्य साथीदार धैर्यशील मदने (रा. रामानंद नगर, ता. पलूस) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव आणि त्यांच्या पथकाने सांगली परिसरात गस्त सुरू केली होती. दरम्यान, धामणी रोडवरील पलाश बिल्डकॉम इमारतीजवळ एक संशयित तरुण बिना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या यामाहा मोटारसायकलसह थांबल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तातडीने सापळा रचून तेजस साळुंखे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गाडीच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने तुंग गावातील आकाशवाणी केंद्रासमोरून ही गाडी चोरल्याची कबुली दिली.

अधिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली. हे चोरटे धैर्यशील मदने याच्या 'स्कोर्पिओ' (चारचाकी) गाडीचा वापर करून दुचाकी चोऱ्या करत असत. दुचाकी चोरून ती स्कोर्पिओमध्ये टाकून पसार होण्याची त्यांची पद्धत होती. तेजसच्या माहितीवरून पोलिसांनी सांगली रेल्वे स्टेशनजवळील म्हसोबा मंदिर परिसरातून अन्य दोन बालअपचाऱ्यांनाही ताब्यात घेतले. या टोळीने गेल्या ६ महिन्यांत तुंग, पलूस, आष्टा, रेठरे धरण, वहागाव (कराड), नेमिनाथनगर आणि अतित (सातारा) परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
 यामाहा आर एक्स १०० (RX 100) : ५ मोटारसायकली (किंमत रु. ३,००,०००/-)
रॉयल एनफिल्ड बुलेट ३५० (सिल्व्हर रंग) :१ (किंमत रु. १,२०,०००/-)
हिरो स्प्लेंडर (काळा रंग) :१ (किंमत रु. ५०,०००/-)
एकूण जप्त मुद्देमाल: ४,७०,०००/- रुपय

सदर आरोपी आणि जप्त केलेल्या ७ मोटारसायकली पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईत एपीआय राजेंद्र यादव, पीएसआय महादेव पोवार, अंमलदार सूर्यकांत साळुंखे, संदीप पाटील, सुनील जाधव, अभिजित ठाणेकर, आणि सायबर पोलीस ठाण्याचे इम्रान महालकरी आदींच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.