'अशी बायको नको रे बाबा...'
वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळाला मारल्या उलट्या फेऱ्या; यमराजाला घातले साकडे
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
भारतीय संस्कृतीनुसार वटसावित्री पौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करून सात जन्म हाच पती मिळावा, त्याला दीर्घायुष्य लाभावे व कुटुंब सुखी राहावे, अशी प्रार्थना करतात. मात्र सध्या अनेक पुरुषांना विवाहानंतर त्यांच्या पत्नीपासून मानसिक छळ, खोटे गुन्हे, न्यायालयीन लढाया, आर्थिक शोषण, सामाजिक बदनामी आणि कौटुंबिक विघटन यांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पत्नीपीडितांनी वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पिंपळाच्या झाडाला उलट्या फेऱ्या मारून 'असली बायको नको रे बाबा' अशी मागणी केली.
मागील सात वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमांतर्गत यंदाही वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शनिवार, २८ रोजी सकाळी ९ ते १२ यावेळेत सर्व पत्नीपीडित पुरुष हे शहर परिसरातील 'पत्नी पीडित पुरुष आश्रम' येथे गोळा झाले. येथे पिंपळ पौर्णिमेचा कार्यक्रम साजरा करत कावळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी पिंपळ वृक्षाचे पूजन करून उलट्या १०८ प्रदक्षिणा घालून त्यांनी आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या.
अनेक पुरुषांनी वैवाहिक जीवनात गंभीर मानसिक, आर्थिक आणि कायदेशीर त्रास सहन केला आहे. काहींना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्यात आले, काहींना कुटुंबापासून दूर व्हावे लागले, तर काहींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनाही समाजासमोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ज्या प्रकारच्या वैवाहिक यातना आम्ही या जन्मात भोगल्या, त्या पुन्हा कधीही आमच्या आयुष्यात येऊ नये, अशी प्रतीकात्मक प्रार्थना पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ वृक्षासमोर केली असल्याची माहिती पत्नी पीडित पुरुष आश्रमाचे अध्यक्ष अॅड. भारत फुलारे यांनी यावेळी दिली.
वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी यमराज बिझी राहतील, म्हणून एक दिवस अगोदरच आम्ही हा उपक्रम करतो. पिंपळ पौर्णिमा साजरी करून 'यमराजाला साकडे घालतो कि 'हे यमराजा, आमच्या बायका उद्या येतील तुला खोट नाट सांगून आम्हाला त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतील. त्यांचे ऐकू नको. त्यांनी आम्हाला या जन्मात अतिशय असह्य वेदना दिल्या असल्याचे पत्नी पीडितांचे म्हणणे आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.