TET पेपरफुटीत बड्या IAS-IPS अधिकाऱ्यांचा हात ?
तपासासाठी १० पथके राज्याबाहेर
ठाणे : खरा पंचनामा
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपर लीक प्रकरणाचे आंतरराज्यीय धागेदोरे थेट बिहार, हरियाणा आणि दिल्लीपर्यंत पसरले असून परराज्यातील काही आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) अधिकारीही पोलिसांच्या रडारवर असल्याचे कळते आहे. त्यासाठी पोलिसांची १० पथके नेमण्यात आली आहेत.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बिजेंदर कुमार आणि त्याचा हरियाणातील साथीदार कपिल दहिया हे या पेपर लीक प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत. या दोघांनी मिळून देशभरातील सरकारी आणि स्पर्धा परीक्षांचे पेपर लीक करण्यासाठी एक मोठी संघटित टोळी (Team) तयार केली आहे. आतापर्यंत देशातील तब्बल २० पेक्षा जास्त मोठ्या परीक्षांचे पेपर लीक करण्यामागे याच टोळीचा हात असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे.
बिजेंदरचे हे रॅकेट महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली अशा विविध राज्यांमध्ये सक्रिय आहे. बहुतांश परीक्षांचे पेपर हे राज्याबाहेर छापले जात असल्याचा फायदा ही टोळी उचलत असे. बाहेरूनच पेपर थेट लीक करणे बिजेंदरला सहज शक्य होत होते. या संपूर्ण प्रकरणाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या भोंगळ आणि संशयास्पद कारभारावर पुन्हा एकदा कडक बोट ठेवले आहे. परीक्षा परिषदेच्या निष्काळजीपणामुळेच आरोपींना पेपर लीक करणे सोपे झाल्याचे बोलले जात आहे.
या महाघोटाळ्यात केवळ दलालच नव्हे, तर परराज्यातील काही बड्या सनदी अधिकाऱ्यांचाही (IAS आणि IPS) थेट सहभाग असल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या रॅकेटची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी ठाणे पोलिसांनी कंबर कसली असून, आरोपींच्या शोधासाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांची तब्बल १० पथके (Teams) देशाच्या विविध राज्यांत रवाना करण्यात आली आहेत. लवकरच या प्रकरणात अनेक बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.