अभिनेते प्रकाश राज यांच्या अडचणीत वाढ; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता !
बंगळुरु न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी
बंगळूरू : खरा पंचनामा
आपल्या परखड भूमिका आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे दाक्षिणात्य आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
बंगळुरु येथील एका न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. एकापेक्षा जास्त मतदार ओळखपत्रे बाळगल्याच्या आरोपाप्रकरणी हे वॉरंट काढण्यात आले असून, यामुळे प्रकाश राज यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही प्रकाश राज न्यायालयात हजर राहिले नाहीत. अखेर कोर्टाने त्यांच्यावर ही कडक कारवाई केली आहे.
'एएनआय' (ANI) या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरु येथील ४८ व्या अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी (ACJM) न्यायालयाने हे अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. प्रकाश राज यांनी न्यायालयीन आदेशांकडे वारंवार दुर्लक्ष केल्याचे कोर्टाने आपल्या आदेशात नमूद केले आहे. हे संपूर्ण प्रकरण २०१९ मधील आहे. वकील दिलीप कुमार यांनी बेंगळुरू येथील हलासुरू गेट पोलीस ठाण्यात प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
भारतीय निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, कोणत्याही भारतीय नागरिकाला देशभरात केवळ एकाच ठिकाणी मतदार यादीत नोंदणी करता येते. एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार ओळखपत्र असणे हा कायद्याने गुन्हा आहे. तक्रारीनुसार, प्रकाश राज यांनी कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा अशा चार वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदार म्हणून नोंदणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दुसरीकडे, प्रकाश राज यांनी भूतकाळात हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. "माझी मतदार नोंदणी केवळ तामिळनाडूमध्येच असून मी तिथूनच मतदान करतो," असे त्यांनी स्पष्ट केले होते. आता कोर्टाने वॉरंट जारी केल्यानंतर प्रकाश राज यांचे वकील या वॉरंटला स्थगिती मिळवण्यासाठी किंवा तातडीने जामीन मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता आहे.
प्रकाश राज हे गेल्या काही दिवसांपासून 'धर्मस्थळ' वादामुळे आधीच चर्चेत आहेत. धर्मस्थळ या तीर्थक्षेत्राची जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठी एक मोठे कारस्थान रचले गेले, असा दावा करणाऱ्या एका रिट याचिकेत प्रकाश राज यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
या वादावर स्पष्टीकरण देताना प्रकाश राज यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेतली होती. "मला एका सहकाऱ्याकडून काही माहिती मिळाली होती, जी मी एक जबाबदार नागरिक म्हणून तत्परतेने 'एसआयटी' (SIT) प्रमुखांकडे सुपूर्द केली. माझे कर्तव्य तिथेच संपले," असे त्यांनी म्हटले होते. मात्र, हा वाद ताजा असतानाच आता मतदार ओळखपत्र प्रकरणात त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार निर्माण झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.