नीट पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांसाठी हवाई दलाची विशेष मोहीम; सीआयएसएफलाही प्रवेशबंदी
नागपूर : खरा पंचनामा
नीट-यूजी पुनर्परीक्षा २१ जून रोजी होत असताना प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाने नागपूर विमानतळावर विशेष गोपनीय मोहीम राबवली. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विविध राज्यांतील परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचविण्यात आल्या.
नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गळती प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) यंदा वाहतूक आणि साठवण प्रक्रियेत विशेष खबरदारी घेतली आहे. त्याअंतर्गत सोमवारी नागपूर विमानतळावर भारतीय हवाई दलाने अत्यंत गोपनीय स्वरूपाची मोहीम राबवली. सूत्रांच्या माहितीनुसार, सी-१३० हरक्युलीस या सामरिक वाहतूक विमानासह इतर विमानांच्या मदतीने एकूण आठ उड्डाणे करण्यात आली. मुख्य विमान रविवारी रात्रीपासून नागपूर विमानतळावर तैनात करण्यात आले होते.
या संपूर्ण प्रक्रियेत टपाल विभागाने प्रश्नपत्रिकांच्या हाताळणीची जबाबदारी सांभाळली, तर सुरक्षा व्यवस्था केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) सोपविण्यात आली होती. मोहिमेत सहभागी अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मुलांचा अथवा नातेवाईकांचा नीट परीक्षेशी संबंध नसल्याचे लेखी हमीपत्र घेण्यात आले. गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी विमानतळावरील नियमित कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) कर्मचाऱ्यांनाही या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले आहे.
सोमवारी सकाळपासून एएन-३२, अव्रो यांसारखी लहान विमाने तसेच हेलिकॉप्टरच्या साहाय्याने प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात आले. विदर्भासह इतर भागांतील परीक्षा केंद्रांपर्यंत या प्रश्नपत्रिका पोहोचविण्यात आल्या. अकोल्यातील शिवणी विमानतळावर सकाळी सुमारे ७.५५ वाजता हवाई दलाचे हेलिकॉप्टर उतरले. तेथून सीलबंद पेट्या कडेकोट सुरक्षेत जिल्ह्यातील विविध सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या.
अमरावतीत सकाळी साडेदहाच्या सुमारास हेलिकॉप्टर हनुमान गढी मैदानावर उतरले. त्यानंतर १० ते १५ वाहनांच्या ताफ्यातून प्रश्नपत्रिका जिल्हा कोषागार तसेच भारतीय स्टेट बँकेच्या कॅम्प शाखेसह विविध सुरक्षित ठिकाणी नेण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्या तिजोरीत ठेवून पुन्हा सीलबंद करण्यात आल्या.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, प्रश्नपत्रिकांचे सीलबंद संच परीक्षा सुरू होण्याच्या काही तासांपूर्वीच संबंधित केंद्रांकडे पाठविण्यात येणार आहेत. नागपूरहून छत्तीसगडमधील जगदलपूर आणि ओडिशातील झारसुगुडा येथेही हवाई मार्गाने प्रश्नपत्रिका पोहोचविण्यात आल्या.
दरम्यान, पुनर्परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करताना तांत्रिक अडचणी, शुल्क परताव्याबाबत संभ्रम आणि एनटीएच्या संकेतस्थळावरील त्रुटींबाबत विद्यार्थ्यांनी सामाजिक माध्यमांवर तक्रारी नोंदवल्या आहेत. या सर्व समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे. पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हाधिकारी यांनी मंगळवारी तयारीचा आढावा घेतला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.