Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काहीजण कष्ट न करताच पुढे जातात, ताकदीला आणि चमत्कारालाच नमस्कार होतो!

काहीजण कष्ट न करताच पुढे जातात, ताकदीला आणि चमत्कारालाच नमस्कार होतो!

मुंबई : खरा पंचनामा 

अजितदादा गटात पक्षांतर्गत धुसफूस उफाळून आली आहे. राज्यसभेची उमेदवारी आणि पुतणे समीर भुजबळ यांना राज्यात मंत्रिपद न मिळाल्याने अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी उघडपणे दिसून आली. काहीजण कष्ट न करताच पुढे जातात, नमस्कार फक्त ताकदीला आणि चमत्काराला होतो, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली.

छगन भुजबळ यांची उमेदवारी हुकल्यानंतर त्यांच्याकडून केली जाणारी विधाने अजित पवार गटातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आणत आहेत. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, गेल्या 26 वर्षांत काहीजण मेहनतीने पुढे आले, तर काहीजण कष्ट न करताच थेट पुढे निघून गेले, असा टोला लगावत पक्षातल्या नेत्यांना घरचा आहेर दिला. भुजबळांचा रोख प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळ यांना राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल विचारले असता, तुमच्या पाठीमागे किती आमदार, खासदार आणि नगरसेवक आहेत यावरच सगळे काही ठरत असते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यावर राष्ट्रवादीला रामराम करणार का असे पत्रकारांनी विचारले असता, आपापसात मतभेद होतात तेव्हा आपण घर सोडत नाही, आपण मते मांडतो, असे उत्तर भुजबळ यांनी दिले.

भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्ट करतानाच दुसरीकडे सुनेत्रा पवार यांचे कौतुकही केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी प्रगती करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पक्षाने काही दिले नाही असे अनेकांना वाटते, पण आपण काम करत राहिले पाहिजे. पदे कमी असतात, पण पक्ष सगळ्यांना न्याय देण्याचे काम करत असतो, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.