Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: मोबाईल चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड२ आरोपी जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: मोबाईल चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड
२ आरोपी जेरबंद, ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

बुधगाव नाका परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला लावलेल्या मोटारसायकलवरून मोबाईल आणि रोख रक्कम चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सांगली ग्रामीण पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली आहे. आरोपींकडून चोरीचा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ५,१९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. शरयू अनिल शिंगटे (वय २६, रा. विष्णुआण्णा नगर, बुधगाव) यांची मोटारसायकल खराब झाल्यामुळे त्यांनी ती बुधगाव नाका येथे रस्त्याच्या कडेला लावली होती. त्या आपल्या मित्राला बोलावून माधवनगर येथे गेल्या असता, अज्ञात चोरांनी त्यांच्या गाडीच्या करिअरवर ठेवलेला मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. १८२/२०२६, बी.एन.एस. कलम ३०३(२) नोंदवण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी आरोपींचा तात्काळ शोध घेण्याचे आदेश दिले होते. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपास करत असताना, त्यांना गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. संशयित आरोपी हे बुधगाव ते बिसूर रोडवर चोरीचा मोबाईल विकण्यासाठी उभे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे तेजस तानाजी पाटील (वय २७ वर्ष, रा. राजवाडा चौक, बुधगाव), अनिकेत लक्ष्मण जाधव (वय २५ वर्ष, रा. राजवाडा चौक, बुधगाव, ता. मिरज) अशी असून पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १,१९,३०० रुपयांचा चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेली कार (किंमत ४ लाख रुपये) असा एकूण ५,१९,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज रूपनर, विजय घोळप, बंडू पवार, अभिजीत पाटील, रणजीत घार्गे आणि आप्पा कोळी व हिम्मत शेख यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बंडू पवार करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.