Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाचखोरी प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदारालाच अटक

अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाचखोरी प्रकरणात ट्विस्ट, तक्रारदारालाच अटक

जालना : खरा पंचनामा 

जालना जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना 3 दिवसापूर्वी रंगेहाथ अटक झाल्यानंतर या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी अवैध वाळू उत्खननाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे.

सुयोग सोळंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे दाखल होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर आता त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्याने विविध स्तरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असून, एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्याची या कारवाईतून जामीनावर सुटका झाली होती.

अवैध वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन तसेच 6 हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना छत्रपती संभाजी नगर येथे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी रंगेहाथ अटक केली होती. या कारवाईने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. यात आता तक्रारदाराला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सुयोग सोळंके याच्याविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2025, 218/2025 आणि 230/2025 असे 3 स्वतंत्र गुन्हे नोंद आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच गौण खनिज (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम 3 आणि 4 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये यापूर्वी त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जामीनही मंजूर झाला होता.

त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गतही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. आता पुन्हा एकदा वाळू चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जालन्याच्या अंबड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबड लाच प्रकरणातील तक्रारदाराच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि अवैध वाळू उत्खननाशी संबंधित साखळी यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

तक्रारदार सुयोग सोळंके याला अटक झाली असल्याची माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना दिली आहे. या अटकेची आता संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखीन काही घडामोडी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.