गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असलेले दोन तडीपार गुन्हेगारांना एलसीबिकडून अटक; दोन कोयते जप्त
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार (हद्दपार) करण्यात आलेले दोन रेकॉर्डवरील आरोपी जिल्हा हद्दीत प्रवेश करून गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने त्यांना मिरज येथे रंगेहात पकडले. त्यांच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इजाज ऊर्फ एजाज अल्फाज शेख (वय २९ वर्षे, रा. उर्दू शाळेजवळ, अमननगर, मिरज), मलिकजान ऊर्फ सोहेल राजू नदाफ (वय २६ वर्षे, रा. कॅनॉल रोड, लक्ष्मी मंदिराजवळ, मिरज). अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि हद्दीत फिरणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले होते.
या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, जून २०२५ पासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेले आरोपी इजाज शेख आणि मलिकजान नदाफ हे मिरज येथील चुनाभट्टी रोडवरील गजानन डेअरीकडे जाणाऱ्या मार्गावर हत्यारांसह फिरत असून, ते एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. माहिती मिळताच पथकाने चुनाभट्टी रोड परिसरात सापळा रचून निगराणी सुरू केली. तेथे दोन संशयित तरुण थांबलेले दिसताच पोलिसांनी कोणतीही संधी न देता त्यांना वेढा घालून ताब्यात घेतले.
पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडे सांगली जिल्हा हद्दीत प्रवेश करण्याबाबतचा कोणताही परवाना किंवा सक्षम प्राधिकाऱ्याचा आदेश नव्हता. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आणि पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्यांच्या कंबरेला दोन धारदार लोखंडी कोयते मिळून आल्याने पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक केली व शस्त्रे जप्त केली.
याप्रकरणी आरोपींविरुद्ध मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम (आर्म अॅक्ट) ४, २५ सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास मिरज शहर पोलीस करत आहेत.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमित परिट, सोमनाथ गुंडे, अमोल ऐदाळे, हणमंत लोहार, रोहन घस्ते तसेच सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर आणि अजय पाटील यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.