सुप्रिया सुळेंचे व्याही भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात
लखानी म्हणाले, "पवार फॅमिली मोठी, त्यांचा मेसेज..."
नागपूर : खरा पंचनामा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने रविवारी रात्री आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने आपल्या यादीत जुन्या-नव्यांचा मेळ घातल्याचे चित्र आहे.
चंद्रपूर-गडचिरोली - वर्धा विधान परिषदेच्या जागेवर भाजप सुप्रिया सुळे यांचे व्याही अरुण लखानी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या उमेदवारीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर अरुण लखानी यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली.
अरुण लखानी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने स्वयंसेवक असून भाजपचे पदाधिकारी आहेत. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अरुण लखानी यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी पक्षनेतृत्वाचे आभार मानले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हीचा विवाह २० जून रोजी अरुण लखानी यांच्या सुपुत्रासोबत होणार आहे.
अरुण लखानी म्हणाले, "पक्षानं मला ही मोठी संधी दिली आहे, त्याबद्दल मी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे मनापासून आभार मानतो. माझा आजवरचा जो काही व्यावसायिक आणि सामाजिक अनुभव आहे, त्याचा पूर्ण वापर मी माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि कामासाठी करणार आहे." लखानी हे जलक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. या क्षेत्रातील आपल्या अनुभवाचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, "मी ज्या पाण्याच्या क्षेत्रात दीर्घकाळापासून काम करत आहे, माझ्या या पदाचा आणि अनुभवाचा फायदा जलसंधारणाच्या आणि पाण्याच्या कामांना नक्कीच होईल."
सुप्रिया सुळे यांचे व्याही असल्याने होणाऱ्या चर्चेवरही त्यांनी अत्यंत स्पष्टपणे भाष्य केले. "पवार फॅमिली खूप मोठी आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे व्याही निवडणूक लढवत आहेत, असा उल्लेख राजकारणात आणि मीडियामध्ये होणारच, हे स्वाभाविक आहे," असे त्यांनी म्हटले. आपल्याला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांचा मेसेज आल्याचे सांगितले. उमेदवारीबद्दल त्यांनी अभिनंदन केल्याचे लखानी यांनी सांगितले.
लखानी यांनी सांगितले की, आज ते आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल करणार आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, उद्यापासूनच ते मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात करणार आहेत. सुप्रिया सुळेंच्या व्याहींना भाजपने मैदानात उतरवल्यामुळे आता या मतदारसंघातील लढत संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेची आणि रंजक ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.