सांगलीत अवैध दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा मोठा हातोडा!
३ दिवसांत ४१ गुन्हे दाखल, २९ आरोपींना अटक
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
पुणे जिल्ह्यात विषारी दारूने घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर, सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात एक धडक विशेष मोहीम हाती घेतली होती. २९ मे ते ३१ मे या अवघ्या तीन दिवसांच्या कालावधीत विभागाने धडक कारवाई करत एकूण ४१ गुन्हे दाखल केले असून २९ आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक क्षेत्रांतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान १ वाहनासह एकूण ५ लाख ७१ हजार ७६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हातभट्टी दारू व रसायन: कारवाई दरम्यान तब्बल १०१५ बल्क लीटर हातभट्टी मद्य आणि १०,१२० बल्क लीटर रसायन जप्त करण्यात आले. हे रसायन जागीच नष्ट करण्यात आले आहे.
ताडी व इतर मद्य:
२५० बल्क लीटर ताडी, ५७.३२ बल्क लीटर देशी मद्य आणि ३.७२ बल्क लीटर विदेशी मद्य (IMFL/Beer) जप्त करण्यात आले. तीन दिवसात केलेल्या कारवाईत एकूण ४१ गुन्हे दाखल करून २९ जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसाय पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, सांगली विभागामार्फत यापुढेही अशीच कडक आणि धडक कारवाई सुरू राहील, असा इशारा राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.