Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वसईतील वाहतूक पोलिसाची कोल्हापुरात गोळी झाडून आत्महत्या

वसईतील वाहतूक पोलिसाची कोल्हापुरात गोळी झाडून आत्महत्या

वसई : खरा पंचनामा 

वसई वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका ३५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने कोल्हापूर येथील आपल्या राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली.

दयानंद पाटील असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद पाटील हे वसई वाहतूक विभागात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. साप्ताहिक सुटी मंजूर झाल्याने ते कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या आपल्या मूळ गावी गेले होते. मंगळवारी दुपारी घरामध्ये कोणीही नसताना, पाटील यांनी त्यांच्याकडील परवानाधारक दोन बोअरच्या पिस्तुलातून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली. गोळीबाराच्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी घराकडे धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पाटील यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेबाबत वसई वाहतूक पोलिसांशी संपर्क साधला असता दयानंद पाटील हे फेब्रुवारी २०२४ पासून वसई वाहतूक शाखेत कार्यरत होते. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले हे अजूनही समजू शकले नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पाटील यांच्या निधनाने वसई पोलीस दलासह त्यांच्या मूळ गावी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.