Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आता गट राहिला नाही, आता एकच शिवसेना राहिली"

"आता गट राहिला नाही, आता एकच शिवसेना राहिली"

कोल्हापूर : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची मोठी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधून ६ खासदार फुटल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून हे 'ऑपरेशन टायगर' राबवण्यात येत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवरच शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून सर्व खासदारांसाठी व्हिप जारी करण्यात आला होता. मात्र, व्हिप जारी करण्यात आल्यानंतरही सहा खासदारांपैकी एकही खासदार पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे हे ६ खासदार फुटल्याचं बोललं जात आहे.

या घडामोडी घडल्या असल्या तरी अद्याप त्या ६ खासदारांची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. दरम्यान, 'ऑपरेशन टायगर'वरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असं असतानाच आज (२० जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.

"एकनाथ शिंदेंच्या पाठी शिवसेना शिंदे गट असं बोलावं लागायचं. मात्र, आता गट राहिला नाही, आता एकच शिवसेना राहिली", असं म्हणत अमित शाह यांनी ठाकरे सेनेच्या ६ खासदारांच्या फुटीच्या चर्चावरून अप्रत्यक्ष भाष्य करत उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.

"आजच्या कार्यक्रमाला माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझे मित्र तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच शिवसेनेचे (शिंदे) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित आहेत. याआधी एकनाथ शिंदेंच्या पाठी शिवसेना शिंदे गट असं बोलावं लागायचं. मात्र, आता कोणता गट राहिला नाही, आता एकच शिवसेना राहिली आहे", असं भाष्य अमित शाह यांनी केलं आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्याच्या १४४५.९७कोटींच्या कामाची पायाभरणी करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आशिष शेलार यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.