Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

शिंदेसेनेच्या नेत्यासह 7 जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ 

कल्याण : खरा पंचनामा 

कल्याणमधील एका वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात शिंदे सेनेचे माजी नगरसेवक तथा उपशहरप्रमुख सुनील वायले यांच्यासह सात जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, उंबडे गावातील जमिनीच्या व्यवहारात मयत व्यक्तीची बनावट घोषणापत्रे तयार करून खोट्या सह्या करण्यात आल्याचा तसेच मयत व्यक्ती जिवंत असल्याचे दाखवून जमीन हस्तांतरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रमोद विश्वनाथ गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ८ मार्च २०२२ ते १८ जून २०२६ या कालावधीत संबंधित जमीन व्यवहारात आरोपींनी संगनमत करून बनावट कागदपत्रांचा वापर केला आणि फसवणूक केली. फिर्यादी हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याचे माहिती असतानाही त्यांच्याशी अन्यायकारक वागणूक देण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणात निर्मला रविकांत वायले, अलका मनोहर वायले, सुनील राजाराम वायले, किसान नधू वायले, शिरीष ढवकी, सुनील मोहनदास हीरचंदानी आणि जिगी लालचंदानी यांच्यासह एकूण सात जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, संबंधित जमीन व्यवहारासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून दिशाभूल करण्यात आली. पोलिसांनी या आरोपांच्या अनुषंगाने तपास सुरू केला असून जमीन व्यवहाराशी संबंधित सर्व कागदपत्रे, पुरावे आणि तक्रारीतील बाबींची सखोल छाननी करण्यात येत असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक सुनील वायले यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. राजकीय आणि आर्थिक हेतूने आपल्याला या प्रकरणात गोवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आम्ही संबंधित जागा जयंती भोईर यांच्याकडून कायदेशीररित्या विकत घेतली आहे. गायकवाड कुटुंबीयांशी आमचा कोणताही व्यवहार झालेला नाही. आमच्याकडील सर्व कागदपत्रे खरी असून आम्ही कायदेशीर लढा देऊ, असे सुनील वायले यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामुळे जमीन व्यवहारातील पारदर्शकता आणि कायदेशीर प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिस तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येणार आहे. खडकपाडा पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.