बायको अन् मेहुण्याने केला घात
ठाण्यातील इंजिनिअरची कराडमध्ये हत्या, सुपारी देऊन संपवलं
सातारा : खरा पंचनामा
सातारा जिल्ह्याच्या कराड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे कार्यरत असणारे अभियंता लक्ष्मण मंडले यांची कारखाली चिरडून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय होता, मात्र पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा घातपात असल्याचं स्पष्ट झालं आहे. कौटुंबीक वादातून पत्नी आणि मेहुण्यानेच सुपारी देऊन हा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अभियंता लक्ष्मण मंडले हे कराड शहरातून आपल्या घराच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळी एका अल्टो कारने त्यांना मागून जोराची धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार हा रस्ते अपघात असावा असा अंदाज वर्तवला जात होता, परंतु कराड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
कारने लक्ष्मण मंडले यांना उडवल्यानंतर कार चालक तिथेच थांबला नाही. त्याने पुढे गेलेली गाडी पुन्हा रिव्हर्स घेतली आणि मंडले यांच्या अंगावरून घातली. एवढ्यावरच न थांबता, तिसऱ्यांदा पुन्हा गाडी त्यांच्या अंगावरून पुढे नेण्यात आली. या क्रूर कृत्यानंतर कारचालक गाडीतून खाली उतरला आणि त्याने मंडले यांच्याजवळील एक बॅग ताब्यात घेतली व तो तिथून पसार झाला.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे जलदगतीने फिरवली. कराड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत या गुन्ह्याची उकल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले यांच्या पत्नीने आणि मेहुण्याने मिळून या हत्येचा कट रचला होता. त्यांनी लक्ष्मण मंडले यांचा काटा काढण्यासाठी मारेकऱ्यांना सुपारी दिली होती. पोलिसांनी संशयित पत्नी आणि मेहुण्याला ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
पोलिसांनी सुपारी देणाऱ्या पत्नीला आणि मेहुण्याला ताब्यात घेतलं असलं तरी कारने चिरडणारे प्रत्यक्ष मारेकरी अजूनही फरार आहेत. या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सातारा आणि कराड पोलिसांची एकूण पाच विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. भररस्त्यात घडलेल्या या क्रूर हत्याकांडामुळे कराड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.