Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

९ तास मृतदेह पोलीस ठाण्यासमोर, ३ दिवस आंदोलन... घुले प्रकरणातील ९ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

९ तास मृतदेह पोलीस ठाण्यासमोर, ३ दिवस आंदोलन... 
घुले प्रकरणातील ९ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

बीड : खरा पंचनामा 

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले हत्या प्रकरणातील फरार असलेल्या सर्व ९ आरोपींना अटक करण्यात बीड पोलिसांना अखेर यश आले आहे.

पोलिसांच्या विशेष पथकाने राज्यातील वेगवेगळ्या भागांतून या आरोपींना ताबा मिळवून बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या सर्व नऊ आरोपींना सध्या केज पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले असून, आज दुपारी त्यांना केज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

विकास घुले यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. विलास घुले हत्या प्रकरणावरून केजमध्ये मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. केज पोलीस स्टेशनबाहेर मंगळवारी, रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू होते. आता या प्रकरणातील सर्व ९ आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे.

केज शहराजवळील टाकळी फाटा येथे विलास घुले यांचे 'गावकरी हॉटेल' आहे. हॉटेल परिसरात सुरू असलेले एक भांडण सोडवण्यासाठी विलास घुले हे मध्यस्थी करायला गेले होते. मात्र, याच वेळी आरोपींनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार करून त्यांची निघृण हत्या केली. या धक्कादायक घटनेनंतर केज पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्येनंतर बीड जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात न घेता ९ तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

घटनेचे गांभीर्य ओळखून बीडच्या पोलीस अधीक्षकांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली होती. या पथकांनी तांत्रिक तपासाच्या आधारे राज्यातील विविध जिल्ह्यांत छापे टाकून सर्व नऊ आरोपींना जेरबंद केले. सुरुवातीला या प्रकरणात ३ आरोपींना अटक करण्यात आली होती, आता उर्वरित सर्व आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

दरम्यान, या प्रकरणात आंदोलकांच्या मागणीनंतर पोलिसांनी रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदवून घेतला आहे. या प्रकरणी घुलेंच्या कुटुंबीयांनी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणेचे नाव घेतले. या पुरवणी जबाबा संदर्भात पोलिसांचा तपास सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. "या पुढील तपासात जसे नवीन पुरावे समोर येतील, त्यानुसार संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल," असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता या राजकीय अँगलने पोलीस काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेतः
बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गुरुबा कदम, रामेश्वर गायकवाड (बाबासाहेब कदम यांचे सासरे), रा. सोनीजवळा, ता. केज, शुभम रामभाऊ गायकवाड (बाबासाहेब कदम यांचे मेहुणे), भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, रा. कदमवाडी, नवनाथ परसराम कदम, दिपक परसराम कदम, संतोष नरहरी कदम.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.