चिंचवड पोलिस ठाण्याच्या PSIवर मद्यधुंद अवस्थेत तपासासाठी गेल्याचा आरोप; वैद्यकीय तपासणी सुरू
पिंपरी : खरा पंचनामा
चिंचवड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकावर मद्यधुंद अवस्थेत तपासाच्या निमित्ताने एका महिलेच्या घरी गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याची वैद्यकीय तपासणी करून रक्ताचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून पोलिस अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी संबंधित पोलिस उपनिरीक्षक एका प्रकरणाच्या तपासासाठी एका महिलेच्या घरी गेले होते. त्या वेळी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप महिलेने केला. यानंतर महिलेने त्यांना विरोध करत थेट चिंचवड पोलिस ठाणे गाठले. पोलिस ठाण्यातही या प्रकारावरून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस उपनिरीक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार, रक्ताचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेचा महिलेने चित्रित केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित अधिकारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा या व्हिडिओच्या आधारे करण्यात येत आहे.
या प्रकरणानंतर संबंधित अधिकाऱ्याबाबत वरिष्ठांकडे गोपनीय अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. यापूर्वीही संबंधित अधिकाऱ्याविरोधात विविध स्वरूपाच्या तक्रारी झाल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.
गुन्ह्यात तडजोड घडवून आणल्याचा, जमिनीच्या वादात हस्तक्षेप केल्याचा तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये मध्यस्थी केल्याचे आरोपही त्यांच्यावर करण्यात येत आहेत. मात्र, या आरोपांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, या प्रकरणानंतर विविध नावांनी माध्यमांना मोठ्या प्रमाणात ई-मेल पाठविण्यात आल्याचेही समोर आले आहे. या सर्व ई-मेलचा मजकूर जवळपास एकसारखाच असल्याने ते एकाच ठिकाणाहून पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. या ई-मेलमागे नेमके कोण आहे, याबाबत चर्चा सुरू आहे.
चिंचवड पोलिस ठाणेसंबंधित पोलिस उपनिरीक्षकाबाबत तक्रार आल्यानंतर त्याचे रक्त नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच या प्रकाराबाबत वरिष्ठांना गोपनीय अहवाल पाठविण्यात आला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.