'1930' सायबर हेल्पलाइनच ठरली फसवणुकीचे हत्यार; खाती गोठवून लाखोंची खंडणी, आरोपी गजाआड
मुंबई : खरा पंचनामा
नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय १९३० सायबर हेल्पलाइनचा गैरवापर करून निष्पाप नागरिकांची बँक खाती गोठवण्यात आली. तसेच त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या अँटी-एक्स्टॉर्शन पथकाने अटक केली आहे. या प्रकरणामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विविध बँक खात्यांमध्ये मुद्दाम लहान रकमा ऑनलाइन पाठवत होता. त्यानंतर त्या व्यवहारांचा आधार घेत १९३० हेल्पलाइनवर खोट्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवत होता. या तक्रारींनंतर संबंधित खातेदारांची बँक खाती गोठवली जात होती.
तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी पीडिताच्या बँक ऑफ बडोदा, राजकोट शाखेतील खात्यावर ₹1,000, ₹1,000 आणि ₹2,000 अशा एकूण ₹4,000 ची ऑनलाइन रक्कम जमा झाली. त्यानंतर ऑनलाइन व्यवहार करताना खाते ब्लॉक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बँकेत चौकशी केली असता पुण्यातील प्रविण कोठारी आणि पुष्पा कोठारी यांच्या खात्यांमधून ही रक्कम पाठवण्यात आल्याचे समोर आले.
पीडिताने संबंधितांशी संपर्क साधल्यानंतर आरोपीने व्हॉट्सअॅप कॉल करून स्वतःला RAW अधिकारी तसेच 'पोलीस फ्रेंड' असल्याचे सांगत दमदाटी केली. खाते पुन्हा सुरू करून देण्यासाठी तब्बल ₹5 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. मात्र पीडिताने पैसे देण्यास नकार देत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर अँटी-एक्स्टॉर्शन पथकाने तपास करून आरोपीला अटक केली. आरोपीचे मोबाईल, आर्थिक व्यवहार आणि 1930 हेल्पलाइनवर दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची सखोल चौकशी सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.