Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मुंबईतील 5 नामांकित क्लबची FSSAI लायसन्स तात्काळ रद्द !

मुंबईतील 5 नामांकित क्लबची FSSAI लायसन्स तात्काळ रद्द !

मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातल्या वेगवेगळ्या हॉटेल आणि डेअरींवर कारवाई केल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या एफडीएने त्यांचा मोर्चा आता मुंबईमधल्या क्रीडा क्लबकडे वळवला आहे. मुंबईमधल्या 5 नामांकित क्लबचे FSSAI चे परवाने एफडीएने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचं उघड होताच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) या नामांकित क्लबवर कारवाई केली आहे.

FSSAI लायसन्स रद्द झालेल्या क्लबमध्ये क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), आरके जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना, एमआयजी क्रिकेट क्लब (वांद्रे पूर्व) आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे.

एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये झुरळ आणि माशांचा प्रार्दुभाव आढळून आला. तसंच या सर्व क्लबची स्वयंपाकगृह अस्वच्छ होती, अन्नपदार्थ एक्सपायर डेट झालेले होते, तसंच साठवणूकही चुकीच्या पद्धतीने केलेली होती. अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचं तपासणीत आढळल्यामुळे एफडीएने या सर्व क्लबचा FSSAI परवाना रद्द केला. एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये वैध FSSAI परवान्याशिवाय थर्ड पार्टीकडून केटरिंग सुरू असल्याचं आढळलं, तर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला परवान्याशिवाय व्यवसाय सुरू असल्याने स्टॉप बिजनेस नोटीस बजावण्यात आली आहे. 24 ते 27 जुलैदरम्यान राज्यभरातल्या 81 हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि धाब्यांची तपासणी एफडीएने केली. या कारवाईमध्ये एफडीएने 11 परवाने निलंबित केले आहेत, तर 12 अस्थापनांना सुधारणा नोटीस बजावली आहे.

काहीच दिवसांपूर्वी तुकाराम मुंढेंच्या एफडीएने मुंबई महापालिकेचं उपहारगृहदेखील सील केलं होतं. महापालिकेच्या मुख्य इमारतीतील उपहारगृहामध्ये गंभीर अस्वच्छता आणि निकृष्ट अन्नाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएच्या पथकाने थेट बीएमसी मुख्यालयातील कॅन्टीनवर धाड टाकून ते सील (Seal) केलं.

महापालिका मुख्यालयातील या उपहारगृहातून दररोज सुमारे 7-8 हजार कर्मचारी नाश्ता, जेवण करतात. पण एका ग्राहकाला दिलेल्या ताकाच्या ग्लासात चक्क मेलेली माशी आढळून आली. एवढेच नव्हे तर, कांदा भजीच्या ऑर्डरमध्ये भजीच्या आत प्लास्टिकचा धागा तळलेल्या अवस्थेत सापडला. या धक्कादायक प्रकारामुळे पालिकेतील कर्मचारी आणि नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही काही नगरसेवकांनी या कॅन्टीनच्या दर्जाबाबत सवाल उपस्थित केले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.