सचिन अहिरांच्या घरात चोरी, 2 कोटी 65 लाखांचा ऐवज लंपास, हिऱ्यांचे दागिने अन् सोन्याचे बिस्किटे गायब
मुंबई : खरा पंचनामा
नुकतेच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे तथा विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्या मुंबईतील निवासस्थानी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्याच घरात धाडसी चोरी झाल्याची माहिती आता समोर आली आहे. अहिर यांच्या घरातून तब्बल 2 कोटी 65 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी सचिन अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेत रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
सचिन अहिर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा कोट्यवधींची रक्कम एकाचवेळी नव्हे, तर टप्प्याटप्प्याने चोरीला गेली आहे. घरातील मौल्यवान वस्तू कमी होत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकाराचा आढावा घेतला. तपासादरम्यान घरातील तब्बल 2 कोटी 65 लाखांचा ऐवज गायब झाल्याचं उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. चोरी झालेल्या कोट्यवधींच्या मुद्देमालात अत्यंत मौल्यवान ऐवजाचा समावेश आहे. यात सोन्याची बिस्कीटे, हिऱ्यांचे महागडे दागिने, चांदीची मौल्यवान भांडी आणि रोख रकमेचा समावेश असल्याची माहिती आहे. या धाडसी चोरीमागे सचिन अहिर यांच्या घरात काम करणाऱ्या एका विश्वासू नोकराचाच हात असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी या धक्कादायक प्रकरणात घरातील नोकर प्रवाणी रमेश सोलंकी याला अटक केली आहे. तो गेल्या 24 वर्षांपासून अहिर यांच्या घरात काम करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी याने चोरीचा माल विकल्याची आणि त्यातून मिळालेले पैसे साथीदारांमध्ये वाटल्याची कबुली दिली आहे. सचिन अहिर यांनी मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. गुन्हे शाखेचे डीसीपी राज तिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. सचिन अहिर यांचा मुलगा कृष्णा अहिर हे कुटुंबासह वरळी सी फेस येथील गुलरुख इमारतीत राहतात. प्रवीण सोलंकी हा गेल्या 24 वर्षांपासून तिथे साफसफाई करत होता. जुना नोकर असल्याने त्याला वरळीतील कार्यालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
घरातील मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत आणि कधी कोणाची ये-जा असते, याची पूर्ण माहिती असणाऱ्या व्यक्तीनेच हा प्रकार केल्याचा अंदाज आहे. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाकडून कसून तपास सुरू आहे. मुंबईतील एका वरिष्ठ नेत्याच्या आणि घटनात्मक पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातच एवढी मोठी चोरी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.